Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी प्राणीसंग्रालयासारखा मोठा प्रकल्प हाती घ्यावा : अभ्यासक सुनील पाटील

सांगली (प्रतिनिधी)
जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी  प्राणीसंग्रालयासारखा मोठा प्रकल्प हाती घ्यावा लागेल. सांगली, मिरज शहरापासून जवळच दंडोबा डोंगरावर त्यासाठी संधी आहेत. देशातील प्रख्यात उद्योग संस्थांकडे तसा प्रस्ताव दिला तर त्या नक्कीच असा प्रकल्प उभा करू शकतील असा विश्वास ‘झु डेव्हलपमेंट’ चे अभ्यासक सुनील पाटील यांनी सांगली व्हिजन @७५ फोरम तर्फे आयोजित संवाद सत्रात व्यक्त केला.

सुनील पाटील सध्या गुजरात राज्यातील एका भव्य प्राणीसंग्रालय प्रकल्पावर काम करत आहेत. त्यांनी त्या दृष्टीने सांगलीतील संधीवर आपला दृष्टीकोन मांडला. फोरमचे मुख्य समन्वयक, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, मानद वनजीव रक्षक अजित उर्फ पापा पाटील प्रमुख उपस्थित होते.

            सुनील पाटील म्हणाले, देशातील मोठ्या उद्योग संस्था देशातील पर्यटन विकास आणि पर्यावरण विकासासाठी काम करण्यास उत्सुक आहेत. त्या दृष्टीने जिल्ह्यातून पाठपुरावा झाला आणि योग्य जागा उपलब्ध करून दिली तर संधी नक्कीच आहे. दंडोबा हे पर्यटन विकासासाठीचे आदर्श ठिकाण ठरेल. कारण ते आता राष्ट्रीय महामार्गावर आले आहे. ते जिल्ह्याच्या ठिकाणापासून अगदी जवळ आहे. सुमारे ५०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प होवू शकतो. चांदोली, सागरेश्वर ही अभयारण्य तर सर्वोत्तम ठिकाण आहे. तेथे पर्यटनास  संधी आहेत.

अजित पाटील म्हणाले, निसर्ग संवर्धन, प्राणी संवर्धन आणि पर्यटन विकास या गोष्टी एकत्र पुढे नेताना आव्हाने खूप आहेत ते पेलून पुढे जावे लागेल. मानवी हस्तक्षेपामुळे बिबट्या, गवा, हत्ती, यासारखे वन्य प्राण्यांचे नागरी वसाहतीमध्ये आगमन होवू लागले आहे. जंगलाचे प्रमाण कमी होत आहे. स्थानिक लोकांचा सहभाग घेवून पर्यटनाचा विकास करता येईल.

    सुरेश पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक विकासाचा नेमका अजंडा घेवून फोरम काम करीत आहे. गेल्या ८ महिन्यात जिल्हा पर्यटनाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, पर्यटन हा उद्योग विकासा इतकाच महत्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या पातळीवर आम्ही प्रयत्न करू. फोरमच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कार्य सुरु असून कवलापूर येथील MIDC च्या १६६ एकर जागेवर ‘स्पाइस अँड फूड पार्क’, नागज येथील ७०० एकर जागेवर MIDC, तसेच आटपाडी सारख्या दुष्काळी भागात MIDC ची उभारणी त्याचप्रमाणे रांजणी येथे शेळी-मेंढी प्रकल्पाबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. चांदोली जंगल, सागरेश्वर अभयारण्य, दंडोबा डोंगर ही आपली ताकत आहे. तेथे विकासासाठी सुनील पाटील यांच्यासारख्या अभ्यासू लोकांची मदत घेवू.

यावेळी फोरमचे सचिव राजगोंडा पाटील यांनी आभार मानले. यावेळी धन्यकुमार शेट्टी, अविनाश चौगुले, बी. के पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

______________________________

Post a Comment

0 Comments