Daily Mahasatta

Daily Mahasatta

फेसबुकच्या माध्यमातून आमिष दाखवून ३ लाखांचा गंडा

इस्लामपूर,  ( प्रतिनिधी )
       स्वस्तात फर्निचर विक्रीचे आमिष दाखवून तसेच सीआयएसएफमध्ये नोकरीस असल्याचे खोटे सांगूत फेसबुक च्या माध्यमातून फसवणूक करून सुमारे ३ लाख २ हजार ७०५ रुपयांचा गंडा घातला असल्याची फिर्याद गोपाल सिंग मिना (वय ३५, मूळ रा. खिरनी, ता. भुसावर, जिल्हा भरतपूर - राजस्थान, सध्या रा. महादेवनगर-इस्लामपूर) यांनी  दिली आहे.   याप्रकरणी अजित कुमार याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

    इस्लामपूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी मिना हे महाराष्ट्र बँकेच्या देवराष्ट्रे शाखेत शाखाधिकारी आहेत. १८ जुलैला फेसबुक खात्यावर त्यांना अजित कुमार नावाने एक ब्लॉक दिसला, ज्यामध्ये त्याने मी सीआयएसएफ मुंबई विमानतळ येथे नोकरीस असून त्याचे फर्निचर विकायचे आहे असे म्हटले होते. खाली संपर्क क्रमांक दिला होता. मिना यांनी त्याला संपर्क साधला. हे सामान ४० हजारला विकायचे असल्याचे त्याने फोनवर सांगितले. हे सामान सीआयएसएफ ट्रान्सपोर्ट ने पाठवतो असे सांगून त्यासाठी त्याने ज्यादा ३,१५० रुपये इमरान नावाच्या व्यक्तीच्या पेटीएमवर पाठवण्यास सांगितले. मिना यांनी १८ जुलैला ते पाठवले. १९ जुलैला व्हाट्सअप्प वर एक रिसीट आली. त्यामध्ये जीएसटीचे ९ हजर ९९९ रुपये लिहिले होते. तीही रक्कम इमरानच्या खात्यात पाठवण्यास सांगितल्यावर गोपाल यांनी ती पाठवली. त्यानंतर फोन आला व ही रक्कम एकत्र पाठवायची नसून ९००० व ९९९ अशी रक्कम पाठवण्यास सांगितले. तेही पाठवले. त्यानंतर पुन्हा १६ हजार ८५२ रुपये इमरान च्या खात्यात पाठवण्यास सांगितले. त्यानंतर जीपीएस चे कारण सांगून पुन्हा २१ हजार ९९० ची मागणी केली. त्यानंतर त्याने ठरलेल्या व्यवहाराचे ४० हजार रुपये एकत्र संजय सिंग यांच्या खात्यात पाठवण्यास सांगितले. मिना यांनी तेही पाठवले. त्यानंतर पुन्हा जीपीएस सिस्टीम मॅच होत नाही असे सांगून २१ हजार ९९० ची मागणी केली. त्यानंतरही जीपीएसचे कारण सांगून ७१ हजार ११० रुपये जनार्धन सिंग यांच्या खात्यात जमा करायला सांगितले. पुन्हा जीपीएस चे कारण सांगत २६ हजार ९१०रु. ची मागणी केली. पुन्हा मोनू प्रसाद यांच्या खात्यात ९९ हजार ७०५ रु. ची मागणी केली. मिना यांनी भावाच्या खात्यातून ती रक्कम पाठवली. पुन्हा जीपीएस सिस्टीम मॅच होत नसल्याचे कारण देत अमित कुमारने पुन्हा तुमची रक्कम रिफंड करायची आहे, त्याची फाईल तयार असे सांगून पुन्हा ३ रु.हजार ची मागणी केली. सामान येईल या आशेने मिना हे वारंवार रक्कम जमा करत राहिले परंतु नंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. एकूण ३ लाख २ हजार ७०५ रुपयांची फसवणूक झाली आहे. ही घटना १८/७/२१ ते २८/७/२१ च्या दरम्यान घडली असून याची नोंद इस्लामपूर पोलिसात झाली असून गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments