Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत भाजीपाला विक्री बंद : शंभोराज काटकर

 
सांगली (प्रतिनिधी)
भाजीपाला विक्रीला सातत्याने अडथळा निर्माण करून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या आणि ठराविक बाजार सुरू करून इतरांचा हक्क डावलला जात असल्याच्या निषेधार्थ मंगळवार १७ ऑगस्ट पासून सांगली शहरात आणि उपनगरांमध्ये भाजी विक्री पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय जनसेवा भाजीपाला संघटनेने घेतला आहे, अशी माहिती अध्यक्ष शंभूराज काटकर यांनी दिली आहे.


याबाबत माहिती देताना शंभूराज काटकर म्हणाले, महापालिका क्षेत्रात कोरोना काळामध्ये कोणीही जनतेच्या घरापर्यंत जाऊन भाजीपाला विक्री करण्यास तयार नव्हते. आमच्या संघटनेने प्रशासनाला पूर्णतः सहकार्य केले. पहिला कोरोना रुग्ण सापडल्यामुळे प्रतिबंधित झालेल्या विजय नगर परिसरात आरोग्य सेवकांच्या बरोबरीने आमचे भाजीपाला विक्रेते घरोघर जाऊन भाजी विक्री करत होते. कोणीही तयार नसताना आमच्या भाजीपाला विक्रेता संघटनेने जिवावर उदार होऊन काम केले. 

मात्र अधिकृत भाजीमंडई च्या नावाखाली ठराविक रस्त्यांवरचे बाजार सुरू करायचे आणि आठवडा बाजार पुढे बंद ठेवायचे असा अन्यायकारक निर्णय घेण्यात आला.  गेली दीड वर्षाहून अधिक काळ आम्ही प्रशासनाला मदत करत आहोत आणि ते सांगतील त्या पद्धतीने भाजीपाला विक्री व्यवस्था उभी करीत आहोत. शहरातील उपनगरांमध्ये ठिकठिकाणी अंतर ठेवून आमच्या विक्रेत्यांना मार्फत विक्री सुरू होती. मात्र नगरसेवक आणि काही पोट दुखत असणारे व्यापारी यांच्या तक्रारीवरून पोलीस आणि महापालिका प्रशासनातील काही अधिकारी आपल्याच प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागेवरून लोकांना उठवण्याचे, त्यांना शिवीगाळ करायची वयाचा मान न राहता अरे तुझी भाषा करायची आणि भाजीपाला वजन तागडे जप्त करायचे असा प्रकार करत आहेत. ' कुत्रे बरी हटकले तर निघून जातात पण हे भाजीपाला वाले परत विक्रीला बसतात' असे म्हणून पोलीस कर्मचारीही भाजीपाला विक्रेत्यांवर उपकार केल्याच्या भावनेने वागत आहेत. यापैकी कोणाच्याही आम्ही मिंधे नाही. सरकारकडे पगार आणि पगारवाढीची भीक न मागता लोकांनी स्वतःच्या जीवावर हा व्यवसाय उभा केला आहे. त्यांच्या सन्मानपूर्वक जगण्यालाही जर अशा पद्धतीने पायदळी तुडवण्याचे प्रयत्न होणार असेल तर त्याविरोधात संघटना शांत राहणार नाही. आमच्या आठवडा बाजारांना पूर्वीप्रमाणे मान्यता द्यावी,  संपूर्ण काळजी घेऊन गर्दी न होईल अशा पद्धतीने विक्रीची व्यवस्था उभा करण्यास बांधील आहोत. हे प्रशासनात वारंवार सांगून सुद्धा त्यांच्याकडून नकारात्मक अशीच प्रतिक्रिया येत आहे. 

एका बाजूला बाजारात गर्दी होते असे म्हणायचे आम्ही अनधिकृत बाजार बसणार नाही असे म्हणायचे आणि दुसरीकडे दत्त मारुती रोडवर बेकायदेशीर बाजारावर डोळेझाक करायची. तशाच पद्धतीने मिरज शहरातील लक्ष्मी मार्केट ते दत्त चौक या रस्त्यावरही बाजार भरून द्यायचा तेथे प्रचंड गर्दी झाली वृत्तपत्रांनी फोटो छापले तरी कारवाई करायची नाही मात्र गर्दी न करता उपनगरात विक्रीव्यवस्था चांगल्या पद्धतीने राबवणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना केवढे नियम दाखवायचे अशा प्रकारचा कारभार करणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या आणि त्यांना साथ देणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ जनसेवा भाजीपाला संघटना भाजी विक्री बंद करणार आहे. अशी माहिती शंभूराज काटकर यांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments