Daily Mahasatta

Daily Mahasatta

दिग्गज नेत्याच्या निधनाने खानापूर तालुका हळहळला


विटा (प्रतिनिधी)
विटा खानापूर तालुक्यातील लेंगरे गावचे सुपूत्र आणि तालुक्याचे ज्येष्ठ नेते जालिंदर बापू हरिबा शिंदे (८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. खानापूर तालुका पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, लेंगरे गावचे सर्वाधिक काळ सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. लेंगरे आणि परिसरातील अजातशत्रू व्यक्तीमत्त्व म्हणून बापूंची ओळख होती. त्यांच्या निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अंत्यसंस्कार विधी बुधवार 18 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता लेंगरे येथे होणार आहे.

खानापूर तालुक्यात जालिंदर शिंदे यांची बापू म्हणून सर्वदूर ओळख होती. खानापूर तालुक्यातील मोठ्या असणाऱ्या लेंगरे ग्रामपंचायतीचे १९८४ ते १९९७ पर्यंत सर्वाधिक काळ सलग सरपंच राहण्याचा मान त्यांना मिळाला. लेंगरे यात्रा कमेटीचे अध्यक्ष आणि पिर कलंदर यात्रेतील मानकरी असणाऱ्या बापूंना गावात आदराचे स्थान होते. आपल्या निरागस आणि सरळमार्गी स्वभावाने त्यांनी ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते. १९९७ साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांना संधी मिळाली. आपल्या कारकिर्दीत भरघोस विकासकामे उभा करीत त्यांनी लेंगरे जिल्हा परिषद गटाचा विकासकामांत दबदबा निर्माण केला होता. आमदार अनिलभाऊ बाबर यांचे निष्ठावंत आणि खंदे समर्थक म्हणून बापूंनी राजकीय वाटचाल कायम ठेवली.

सन २००२ साली खानापूर तालुका पंचायत समितीचे उपसभापती म्हणून अडीच वर्षे आणि त्यानंतर सभापती म्हणून २००४ मध्ये त्यांना संधी मिळाली. या कालावधीत देखिल त्यांनी खानापूर पंचायत समितीचा नावलौकीक वाढवला. सभापती म्हणून कार्यकाल संपल्यानंतर मात्र बापूंनी राजकारणातून अलिप्त रहात मार्गदर्शकाची भूमिका घेतली. राजकीय पदावर असतानाही राजकीय अभिनिवेश नसणारे, निरागस आणि सरळमार्गी व्यक्तीमत्त्व म्हणून बापूंची तालुकाभर ओळख होती. त्यांच्या निधनाने तालुक्यासह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. अंतिम संस्कार बुधवार 18 रोजी दुपारी 2 वाजता लेंगरे येथे होणार आहे.

Post a Comment

0 Comments