Daily Mahasatta

Daily Mahasatta

कापड निर्यातदारांच्या ऑर्डरमध्ये मोठी वाढ होणार : सतीश मालू


कुपवाड : प्रतिनिधी
निर्यात उत्पादनांवरील शुल्क आणि करांवर परतावा ही नवीन प्रोत्साहन योजना सुरू केल्यामुळे निर्यातदार आता त्यांच्या ग्राहकांना स्पर्धात्मक किंमत देऊ शकतील. चांगल्या किंमतीमुळे उत्पादकांना अधिक ऑर्डर मिळण्यास मदत होईल आणि परिणामी त्यांची उत्पन्ने वाढतील, असे मत कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी व्यक्त केले आहे.

सतीश मालू  म्हणाले, निर्यात उत्पादनांवरील शुल्क आणि करांवर परतावा (RoDTEP) या योजने खालील नवीन दरांनुसार, सूत आणि विविध प्रकारच्या कापडांच्या निर्यातीवर  मोठ्या प्रमाणावर  प्रोत्साहन परतावा वाढ घोषित करण्यात आली आहे. हे  लाभ मिळवण्यासाठी जरी खरेदी किंमतीवर मर्यादा घातली गेली असली तरी वस्त्र क्षेत्रातील निर्यातदारांचे मते  ह्या नवीन परतावा  योजनेमुळे  निश्चितपणे उत्पदान  खर्च कमी होऊन स्पर्धात्मकता वृद्धी होईल. इतर काही आशियाई देशांतील कापड उत्पादकांकडून असलेली किमतीची स्पर्धा ही भारतीय निर्यातदारांसमोर असलेल्या प्रमुख आव्हानांपैकी एक आहे. हे देश युरोपीय आणि इतर बाजारांशी मुक्त व्यापार करार योजनेचा  फायदा घेतात, ज्यामुळे त्यांना भारतीय उत्पादकांपेक्षा प्राधान्य  मिळते.  विशेषत: तयार वस्त्रे  आणि इतर वस्त्र प्रावरणे यांसाठी याचा परिणाम होतो आहे. सरकारने मर्चेंडाइज एक्सपोर्ट इन्सेन्टिव्ह स्कीम मागे घेतल्यानंतर भारतीय वस्त्र सध्या विविध देशातून सूत, कापड तसेच तयार कपड्यांसाठी मोठ्या प्रमाणात चौकशी सुरु होऊन निर्यात मागणी वाढू लागली आहे. आणि अशा योग्य वेळी या  वाढीव दरांची  घोषणा झाल्याने  निर्यातदार मागणीचा लाभ घेऊ शकतात. जसजशी मागणी वाढत जाईल तसतशी स्पर्धात्मकता निश्चितपणे वाढेल आणि जास्त ऑर्डर येतील. 
कापड उत्पादक तसेच मानवनिर्मित फायबर उत्पादक (एमएमएफ) यांना यात प्रामुख्याने फायदा असेल. सदर कर परतावा योजनेनुसार ०. ७ टक्क्यापासून ४. ३ टक्के  कर परतावा मिळणार आहे असे मत कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments