Daily Mahasatta

Daily Mahasatta

महिला मंडळ व पत्रकार संघामार्फत सैनिकाना पाठवल्या राख्या


कोटेश्वर महिला मंडळ व शिराळा तालुका पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम
       
मांगले (राजेंद्र दिवाण)

        घरोघरी विविध सण ,उत्सव  साजरे होत असताना देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना मात्र ,कुठलाही सण नाही की उत्सव नाही .देशाची सुरक्षा करणे हेच एकमेव ध्येय त्यांच्या समोर असल्यामुळे रक्षाबंधन असो की भावबीज असो ,अश्या  सणांची ते मोठ्या आतुरतेने वाट पहात असतात .
          रक्षाबंधनानिमित सीमेवरील सैनिकांना राखी पाठवून ,सैनिक हो तुमच्यासाठी ,अशी भावना व्यक्त करीत आम्हीं तुमच्या सोबत आहोंत हे दाखवून देण्यासाठी कोटेश्वर महिला मंडळ व शिराळा तालुका पत्रकार संघ यांनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी रेशीम धाग्याच्या अतिशय आकर्षक  सुबक  अश्या एक हजार एक   राख्या तयार करून शुभेच्छा पत्रासह  एका छोट्या समारंभात सिक्कीम  येथे कार्यरत असणारे विकास राजाराम सावंत जे डी इंडियन आर्मी व इंडियन नेव्ही मध्ये कार्यरत असणारे कृष्णात पाटील यांच्या कडे सुपूर्त करण्यात आल्या.
        या कार्यक्रमाला कोटेश्वर महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुशीला कुरणे ,उपाध्यक्षा सौ. सरोजिनी कदम,कार्याध्यक्षा सौ. डॉ.उज्वला पाटील ,सचिवा सौ. संगीता खटावकर , कोषाध्यक्षा सौ. सुचेता हसबनिस ,  महाजन कन्सर्न्स च्या संचालिका सौ.  सुखदा महाजन जेष्ठ पत्रकार सुमंत महाजन,रविंद्र कदम आदी प्रमुख उपस्थितीत होते .
        प्रारंभी महिला मंडळाच्या संचालिका  सौ .स्मिता पारेख व सौ. वर्धा कुलकर्णी यांनी जवानांना राखी बांधून औक्षण केले. तर श्रीमती एस.जे.खोत ,व सौ.ऍड.स्मिता खुर्द आणी  सौ.अपर्णा तोडकर यांनी गुलाबाचे रोप देउन  दोघा जवानांचा सत्कार केला
      या वेळी  जवान विकास सावंत आपले  मनोगत व्यक्त करताना म्हणाले,दिवाळी असो की रक्षाबंधन अश्या सणांना किंवा उत्सवांना देशाचे रक्षण करीत असलेले सैनिक घरी उपस्थितीत  राहू  शकत नाहीत .त्यामुळे  देश वासीयांकडून त्यांना राखी  सारख्या गोष्टी मिळाल्या की खूप आनंद होतो.आज संगणकीय करणामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी या राख्यांचे महत्व कमी झालेले नाही.या राख्या सीमेवरील सैनिकापर्यंत पोहोचवल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले .
        या वेळी बोलताना जवान कृष्णात पाटील म्हणाले की,आपले सैनिक देशाच्या सीमेवर कुठल्या परिस्थितीत जीवन जगत असतात याची अनेकांना कल्पना नाही.सैनिकांना फ़क्त प्रेम हवे आणि ते मिळाले की त्यांचे आत्मबल वाढत असते.राखी म्हणजे केवळ रेशमी धागा नाही तर त्या धाग्यापासून त्यांना एक वेगळी शक्ती मिळत असते.
  स्वागत व प्रास्ताविकात  कार्याध्यक्षा  डॉ. सौ .उज्वला पाटील यांनी महिला मंडळ व पत्रकार संघ यांनी आजवर राबविण्यात आलेल्या उपक्रमाची  माहिती दिली.आभार सौ.नंदिनी काटकर यांनी मानले .
   वंदे मातेरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments