Daily Mahasatta

Daily Mahasatta

बारावीच्या परीक्षेचा अर्जच गहाळ, निकाल न मिळाल्याने विद्यार्थिनीने दिला उपोषणाचा इशारा

शिराळा (विनायक गायकवाड)
पणुंब्रे तर्फ शिराळा (ता.शिराळा) येथील दिपाली रघुनाथ चौगुले या १२ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीचा परीक्षा अर्जच क्लार्कच्या चुकीने गहाळ झाला आहे. या विद्यार्थ्यांनीला निकाल न मिळाल्याने तिचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनीने  मला योग्य ती चौकशी करून १२ वीचा निकाल दयावा व संबंधितावर योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा मी कुटूंबासमवेत तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असलेचे निवेदन तहसिलदार गणेश शिंदे यांना दिले आहे.
    
        या निवेदनात दिपाली चौगुलेने म्हटले आहे की, मी प.त. शिराळा येथील रहिवाशी असून इ . ८ वी पासून न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज पणुंब्रे घागरेवाडीमध्ये शिकत आहे. यावर्षी मी इयत्ता १२ वी मध्ये होते. कोरोनामुळे वेळोवेळी शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले. तसेच वेळोवेळी शाळेमध्ये उपस्थित रहात होते. १२ वी फॉर्म फी भरली व फॉर्मही शाळेत दिला. पेपरसुध्दा घरी सोडवायला दिले होते.आठ दिवसांपूर्वी मला हायस्कूलमध्ये बोलावून घेवून तुझा फॉर्म बोर्डाकडून ऑनलाईन रिजेक्ट झाला असल्यामुळे तुझे नाव यादीत नाही असे सांगण्यात आले.
 
   यानंतर मी व घरच्यांनी त्यांच्याकडे फॉर्म भरलेली बोर्डाकडे पाठवलेल्या अर्जाची यादी मागीतली असता तशी देता येत नाही असे सांगीतले व चार दिवसांत नाव येईल असे सांगीतले. पुन्हा चार दिवसांनी चौकशीला गेल्यानंतर तुझे नाव यादीतून गहाळ झाले असे सांगीतले. आता आम्ही काही करू शकत नाही. तसेच क्लार्कची चुकी झाली असे मुख्याध्यापकांकडून सांगण्यात आले. माझी कोणतीही चुक नसताना मला परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आज निकाल नाही मिळाला. तरी मला योग्य ती चौकशी करून निकाल दयावा व संबंधित व्यक्तींवर योग्य ती कार्यवाही करावी.

मला दाद न मिळाल्यास मी कुटूंबासमवेत तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. असा इशारा तिने निवेदनात दिला आहे. या निवेदनाच्या प्रति शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजीत देशमुख, मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांना देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments