Daily Mahasatta

Daily Mahasatta

काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विशाल पाटील, पण जिल्ह्यात वर्चस्व मात्र मंत्री विश्वजीत कदम यांचे राहणारसांगली (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी विशाल प्रकाशबापू पाटील यांना संधी देण्यात आली आहे. तर सांगली ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष पदी जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांची निवड करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना जरी प्रदेश उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली असली तरीही सांगली जिल्ह्यावर वर्चस्व मात्र मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसचे नेते स्वर्गीय डॉ. पतंगरावजी कदम यांचे थोरले बंधू आम. मोहनराव कदम यांनी काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची धुरा अनेक वर्ष समर्थपणे सांभाळली. सांगली जिल्ह्यात आता पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी नूतन जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात येणार होती. या पदासाठी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू तसेच वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. लोकसभेच्या निवडणुकीला काँग्रेसला रामराम ठोकत विशाल पाटील यांनी स्वाभिमानीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी पुन्हा एकदा जुळवून घेतले होते. काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी त्यांनी मोर्चेबांधणी केली होती.

नुकत्याच राज्यातील काँग्रेस कार्यकारणीच्या निवडी जाहीर झाल्या. यामध्ये विशाल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली तर सांगली जिल्हा ग्रामीण च्या जिल्हाध्यक्षपदी  मंत्री डॉ.  विश्वजीत कदम यांचे मावसबंधू जतचे आमदार विक्रम सावंत यांची निवड झाली. आमदार विक्रम सावंत तसेच काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे दोघेही मंत्री विश्वजीत कदम यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे आगामी काळात देखील सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या वाटचालीत मंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांचेच वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
...................................
समर्पित वृत्तीने कार्य करत राहीन...
महाराष्ट्र काँग्रेस सांगली जिल्हा अध्यक्षपदी माझी निवड करून , मला पक्ष बांधणीची महत्वपूर्ण कामगिरी दिल्याबद्दल  काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय सोनिया गांधी जी , काँग्रेसचे नेते माननीय राहुल गांधी , महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले, महसूल मंत्री नाम. बाळासाहेब थोरात आणि राज्यमंत्री नाम . विश्वजीत कदम तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते  या सर्वांचे  धन्यवाद ! पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी , मी नेहमीच  बांधिलकी, सहकार्यभाव आणि समर्पित वृत्तीने  कार्य करत राहीन.
        आमदार विक्रम सावंत
         काँग्रेस जिल्हाध्यक्ष, सांगली.

Post a Comment

0 Comments