Daily Mahasatta

Daily Mahasatta

' नारळ तुम्ही फोडत राहा, उमेदवारी मला मिळो ', विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांमध्ये जुगलबंदी


सांगली (प्रतिनिधी )
सांगली विधानसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसअंतर्गत असलेला संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नेमिनाथनगर येथील उद्घाटनाचा नारळ फोडताना, सगळे नारळ फोडण्याचे काम पृथ्वीराज बाबांनी करावे आणि ऐनवेळी विधानसभेची उमेदवारी  आपल्याला मिळो, अशी मिश्कील टिप्पणी केली. तर बाबांनी देखील मिश्कीलपणे उत्तर देत उमेदवारी मिळो पण ती लोकसभेची अशा शुभेच्छा देत विशाल पाटील यांचा चेंडू तडखावून लावला.

सांगलीच्या गतविधानसभा निवडणुकीत आमदार सुधीर गाडगीळ आणि काँग्रेसचे पृथ्वीराज बाबा पाटील यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत झाली. या लढतीत केवळ सहा हजार मतांनी पृथ्वीराजबाबांचा निसटता पराभव झाला. पण पराभवानंतर तातडीने सावरत पृथ्वीराज बाबा पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागले. सांगली मतदारसंघात नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यात काँग्रेस जिवंत ठेवण्याचे काम पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत देखील काँग्रेसचे प्रबळ दावेदार मानले जातात. मात्र उद्घाटनाच्या निमित्ताने कॉंग्रेस मधील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले.

नेमिनाथ नगर या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या बाल उद्यानाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे नेते विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यात ही खुमासदार जुगलबंदी रंगली होती. मंत्री जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांना नारळ फोडण्यास निमंत्रित केले.  पण विशाल पाटील यांनी पृथ्वीराज पाटील यांना नारळ फोडायला सांगावे, असे सुचवले. त्यानुसार मंत्री जयंत पाटील यांनी पृथ्वीराज पाटील यांना नारळ फोडण्यासाठी पुढे बोलावले. पृथ्वीराज पाटील नारळ फोडायला पुढे गेल्यानंतर विशाल पाटील यांनी ' सगळे नारळ बाबांनी फोडावे, मात्र विधानसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळावी' अशी टिप्पणी केली.  पृथ्वीराज बाबांनी देखील हजरजबाबीपणे उत्तर देत ' उमेदवारी मिळो, पण ती लोकसभेची ' असे सांगत विशाल पाटील यांचा चेंडू तडाखावून लावला. बाबांच्या या उत्तरामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
      
विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यात काँग्रेसच्या उमेदवारीवरून जुगलबंदी सुरू असतानाच राष्ट्रवादीचे संजय बजाज यांनी देखील या वेळी राष्ट्रवादी देखील आपला दावा सांगणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीतून उमेदवारी कोणाला ? यावरून सुप्त संघर्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.


Post a Comment

0 Comments