Daily Mahasatta

Daily Mahasatta

निवारा केंद्रातल्या पूरग्रस्तांना काँग्रेसनं कुटुंबासारखं सांभाळलं : पृथ्वीराज पाटील


सांगली, (प्रतिनिधी)
महापुराच्या भयंकर संकटात अडकलेल्या पूरग्रस्तांना निवारा केंद्रात कुटुंबासारखे सांभाळले, त्यांची मनापासून सेवा केली, अशा शब्दात काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने येथील कल्पतरू मंगल कार्यालयामध्ये पूरग्रस्तांची राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली होती. २४जुलैपासून ३१ जुलैपर्यंत  निवारा केंद्रात तीनशेहून अधिक लोक राहिले होते. पूर ओसरल्यामुळे शनिवारी या केंद्राचा समारोप करण्यात आला. त्यावेळी पूरग्रस्त भावनावश झाले.

यावेळी पक्षाचे नेत्या जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, जे. के. बापू जाधव उपमहापौर उमेश पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पृथ्वीराज पाटील म्हणाले, अतिवृष्टीमुळे नको ते संकट सांगलीकरांवर येऊन ठेपले. कृष्णा नदीला प्रचंड पाणी आले आणि त्यामुळे शहराच्या विविध भागातील लोकांना आपली घरे दारे सोडावी लागली. हे संकट ओळखून काँग्रेसने लगेच हे निवारा केंद्र सुरू केले. कार्यकर्त्यांनी ते अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवले. कर्तव्यभावनेतून काम केले. आज अत्यंत जड अंतकरणाने पूरग्रस्तांना निरोप दिला. जयश्रीताई पाटील आणि विशाल पाटील यांनीही शाळांमध्ये निवारा केंद्र चालवून पुरग्रस्तांना मदत केली आहे. 

यावेळी विशाल पाटील म्हणाले, पूरग्रस्तांसाठीचे हे निवारा केंद्र शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवले. सांगलीतील हे सर्वोत्कृष्ट निवारा केंद्र म्हणावे लागेल. इथले जेवण, स्वच्छता, आरोग्य सुविधा यात कुठेच कमतरता भासू दिली नाही. आपलेपणाने हे काम केले.  

जयश्री पाटील म्हणाल्या, संकटात धाऊन येण्याची काँग्रेसची परंपराच आहे.  पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी पुढे येऊन पूरग्रस्तांसाठी मदत केली.

यावेळी पूरग्रस्त महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. या केंद्रात आमची खूप चांगली सेवा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास माजी उपमहापौर प्रशांत पाटील, नगरसेवक संतोष पाटील, किरणराव माने, आप्पासाहेब पाटील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पूरग्रस्त उपस्थित होते. स्वागत बिपीन कदम यांनी केले, तर आभार नेमिनाथ बिरनाळे यांनी मानले.
---------

Post a Comment

0 Comments