Daily Mahasatta

Daily Mahasatta

काँग्रेसचे राज्यव्यापी जनआंदोलन : पृथ्वीराज पाटील यांची माहिती

: ८ ते १६ जुलैपर्यंत सह्यांची मोहीम, सायकल यात्रा,

सांगली (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि खाद्यतेलाच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आहेत. त्यामुळे लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. या जीवघेण्या महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार ८  ते १६ जुलैदरम्यान तीव्र जनआंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. 
पृथ्वीराज पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी या आंदोलनाच्या बाबतीत कार्यक्रम ठरवून दिला आहे, त्यानुसार सह्यांची मोहीम, सायकल यात्रा आणि महिलांचे आंदोलन होणार आहे. गुरुवार, दि. ८ रोजी सर्व विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी  पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीविरोधात सायकल यात्रा काढून निषेध नोंदवण्यात येणार आहे. या आंदोलनात मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार - खासदार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि जिल्ह्यातील प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. शुक्रवार दि. ९ रोजी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्यावतीने महागाईविरोधात जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी ११ वाजता आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे. सोमवार दि. 12 जुलै रोजी पुष्कराज चौक, राममंदिर, पंचमुखी मारूती रोड, बालाजी चौक, स्टेशन चौक या मार्गाने शहर व जिल्हा पातळीवर सायकल यात्रा काढून महागाई विरोधात भाजप सरकारचा निषेध करण्यात येणार आहे.
रविवार, दि. ११ ते १५ जुलैदरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, एन.एस. यु. आय., सेवादल, सर्व डिपार्टमेंट व सेल यांच्यावतीने राज्यातील प्रत्येक भागात जिथे जिथे पेट्रोल पंप आहेत, तेथे जाऊन इंधन दरवाढीविरोधात सामान्य नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक ब्लॉकमधून किमान पाच हजार नागरिकांच्या सह्या घेण्यात येतील. या मोहिमेत मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार - खासदार,  जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचाही सहभाग राहणार आहे.

मंगळवार, दि. १३ रोजी ब्लॉक पातळीवर कुपावाड येथून  सायकल यात्रा काढण्यात येणार आहे. पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमतीच्या विरोधात किमान पाच किलोमीटर सायकल यात्रा काढून पेट्रोल पंपाजवळ ती विसर्जित करण्यात येणार आहे. दि. १२ ते १५ जुलैदरम्यान महिला काँग्रेसच्यावतीने ब्लॉक पातळीवर आंदोलन करण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीविरोधात या महिला तीव्र निदर्शने करतील. दि. १६ जुलै रोजी राज्यपातळीवर मुंबई येथे महागाईविरोधात सायकल यात्रा काढण्यात येणार आहे. 
याप्रमाणे तीव्र जनआंदोलन करून केंद्रातील भाजप सरकारला ही दरवाढ मागे घेण्यास भाग पाडून, सामान्य लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments