Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळा ओढ्यात एमआयडीसी मधील कंपन्यांनी दूषित सांडपाणी सोडलेशिराळा ( विनायक गायकवाड)

            शिराळा एमआयडीसी मधील २ कंपन्यांचे दूषित, दुर्गंधी युक्त खराब सांडपाणी ओढ्यात सोडण्यात येत आहे. त्यामुळे जनावरांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याची प्रत्यक्ष पाहणी करून हे पाणी बंद करावे अशा आशयाचे निवेदन भटवाडी गावचे सरपंच विजय महाडीक यांनी तहसीलदार गणेश शिंदे यांना दिले आहे.

         त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एमआयडीसी मधील कॅलर्स बायो एनर्जी आणि श्रीराम पेपर मिल या दोन कंपन्या मधून येणारे दूषित सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय सरळ ओढ्यात सोडले जात आहे. त्याचा रंग पूर्ण काळा असून त्याला दुर्गंधी देखील आहे. पावसाळा सुरू झाला की गेली दोन वर्षे या कंपन्या दूषित दुर्गंधी युक्त सांडपाणी ओढ्यात सोडत आहेत. त्यामुळे याठिकाणचे वातावरण अतिशय खराब झाले आहे. हे दूषित सांडपाणी पाणी खेड ओढ्यातून शिराळा ओढ्यातून मोरणा नदीत जात आहे. खेड ग्रामपंचायतने सुद्धा याचा बंदोबस्त करावा असा अर्ज केला आहे. हे सलग तीन वर्षे चालू आहे. प्रदूषण महामंडळसुद्धा याबाबत दखल घेत नाही. स्थळ पाहणी करून कारवाई व्हावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांची आहे. 

गेल्या २ वर्षात अनेक जनावरे दगावली आहेत. साथीचे रोग देखील पसरत आहेत. इथून पुढे हे असे चालत राहिले तर खेड, शिराळा येथील विहिरी, कूपनलिका यांना दूषित पाणी येईल. याचा परिणाम मानवी शरीरावर झालेला दिसून येईल. कंपनीतून निघणारे दूषित पाणी त्यांनी स्वतःच्या जागेमध्ये सोडावे. त्यावर योग्य ती प्रक्रिया करून मगच हे पाणी ओढ्यात सोडावे. याबाबत वारंवार भटवाडी, खेड, शिराळा येथील शेतकरी तक्रारी देत आहेत मात्र शासकीय यंत्रणेकडून कोणतीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे तहसीलदार यांनी येथील स्थळ पाहणी करून नागरिकांना न्याय द्यावा.

शासकीय अधिकाऱ्यांची डोळेझाक :

 सदर प्रकरण खूप गंभीर आहे. मात्र याकडे अधिकारी डोळेझाक करीत आहेत. तात्पुरती मलमपट्टी करून विषय थांबवला जात आहे. त्यामुळे येथील नागरिक शासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजावर रोष व्यक्त करत आहेत. वरिष्ठ पातळीवर याची दखल घेऊन सदर प्रकरणाचा कायम स्वरुपी बंदोबस्त करावा.

श्री. विजय महाडीक, 
सरपंच भटवाडी.

Post a Comment

0 Comments