Daily Mahasatta

Daily Mahasatta

कडेगाव नगरपंचायतीच्या मनमानी कारभारा विरोधात उपोषणाचा ईशारा

: २४ लाखाचा ठेका एका वर्षात गेला ७४ लाखावर
: ४ लाखाला मिळणारी घंटागाडी ६ लाखाला खरेदी

 कडेगाव  (सचिन मोहिते) : कडेगाव नगरपंचायतीचे भाजपाचे नगरसेवक नितिन शिंदे यांनी कडेगाव नगरपंचायतीच्या मनमानी कारभारा विरुद्ध आमरण उपोषण करण्याचा ईशारा प्रांताधिकारी गणेश मरकड व तहसिलदार डाँ.शैलजा पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे देण्यात आला आहे .

प्रांताधिकारी व तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी  म्हटले आहे की  कडेगाव नगरपंचायतीच्या प्रभाग क्र १७ चे नगरसेवक या नात्याने प्रतिनिधित्व करीत आहे. माझ्या प्रभागातील विविध समस्यांबाबत वेळोवेळी नगरपंचायत प्रशासनाला अर्ज व विनंती करून अडचणींची सोडवणूक करीत असतो.
  
महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय क्र.पूरक २०२१/प्र.क्र७०(५४)/न.वी १६ दि.०३ मे २०२१ रोजी नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी अनुदान या योजनेअंतर्गत डॉ रेणूशे हॉस्पिटल ते  युवराज राजपूत घर मार्गे वडतूकाई मंदिर पर्यंत गटर व रस्ता कामासाठी रु २० लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर रस्ता हा प्रभाग क्र १६ व १७ च्या मध्यातून जातो. शासन नियमानुसार या संपूर्ण रस्त्याचे मोजमाप सार्वजनिक बांधकाम विभागास देणे गरजेचे होते परंतु डॉ रेणूशे हॉस्पिटल ते युवराज राजपूत घरमार्गे अर्ध्यावर शंभूराजे चौकापर्यंत रस्ता मोजणी केली आहे. व राहिलेल्या मोजमापात प्रभाग १६ मधील गटरचे मोजमाप घेतले गेले आहे. या गटरातील सांडपाणी लघु पाटबंधारे तलावाच्या कॅनल मध्ये सोडले जाणार आहे, ही बाब माझ्या लक्षात येताच मा. मुख्याधिकारी यांना दि २१.०६.२०२१ रोजी तक्रार अर्ज देऊन याबाबत माहिती करून दिली होती. स्थानिक लोकांची मागणी हि रस्त्याची असून अगोदर रस्ता पूर्ण करावा, असे  मागणीचे निवेदन दिले होते. तसेच आपण या बाबत काय निर्णय घेतला आहे याची माहिती मिळावी, असा विनंती अर्जही केला होता. एक आठवडा वाट बघून मी पुन्हा दि. २७.०६.२०२१ रोजी स्मरण म्हणून मा नगराध्यक्ष व मा मुख्याधिकारी यांना विनंती अर्ज केला होता. आत्मदहन किंवा उपोषण केल्यावरच रस्ता मिळेल का ? अशी विचारणाही केली होती. लोकहिताचा विचार करून माझ्या मागणीप्रमाणे रस्ता झाला तर स्वपक्षातील नगरसेवक नाराज होतील. त्यापेक्षा पक्षातील नगरसेवकांची मर्जी राखून विरोधकांची कामे टाळली व कितीही गैरव्यवहार केले तरी आपणास कोणीही विचारणार नाही, अशी धारणा  यांची झालेली आहे. 
     
या रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या लोकांनी नगरपंचायत प्रशासन व पदाधिकारी यांच्या नाकर्तेपणाला कंटाळून लोक वर्गणीतून रु ५०,०००/- (पन्नास हजार) खर्चून रस्त्याचे मुरमीकरण व रु २,०००००/- (दोन लाख) खर्चून बंदिस्त गटर काम केले आहे. नियमित महसूल भरून सुद्धा रस्त्याबाबतची हि उपेक्षा नागरिकांच्या पदरी ग्रामपंचायत काळापासून कायम आहे. आता सुद्धा शासन निधी येऊनही तो शासन आदेशानुसार नियोजित व आवश्यक त्या ठिकाणी न वापरता तसेच स्थानिक लोकांची रस्त्याची गरज विचारात न घेता सूड भावनेने मंजूर निधी इतरत्र वापरला जात आहे.
    विरोधी पक्षाचा नगसेवक निवडून दिला याचा राग मनात धरून लोकांवर अन्याय करण्याची हि नवीन पद्धत रुजू होत आहे. मिटिंग मध्ये यांनी केलेल्या गैरकारभारावर मी नेहमी आक्रमक भूमिका घेत आलो आहे त्याचा राग मनात धरून या कामाला विरोध होत आहे. 
यापूर्वी सन २०१९-२०  मध्ये असणारा स्वच्छता ठेका रु २४ लाख वरून , सन २०२०-२१ मध्ये रु ७४ लाख कसा झाला ? रु ४ लाख असणारी घंटागाडी रु ६ लाखांना, खरेदी कशी काय झाली ? स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या  कार्यक्रमांवर झालेली लाखो रुपयांची उधळपट्टी आणि हा खर्च होऊन सुद्धा अस्वच्छ असलेले गाव, माझी वसुंधरा अभियानात लाखो रुपये खर्चून आलेले अपयश. याची माहिती दस्तुरखुद्द सत्ताधारी गटातील सर्व नागसेवकाना नाही तर विरोधक दूरच.  तरी शासन आदेशानुसार डॉ रेणूशे हॉस्पिटल ते  युवराज राजपूत घर मार्गे वडतूकाई मंदिर पर्यंत रस्ता पूर्ण करणे कामी आदेशित करावे. याबाबत आपणाकडून मला दि २० जुलै २०२१ पर्यंत न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. अन्यथा दि २३ जुलै २०२१ पासून न्याय मिछळेपर्यंत नगरपंचायत. कडेगाव येथे आमरण उपोषणास बसणार आहे .असा इशारा त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments