Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळ्यात १६ तोळ्याचे दागिने लंपास

शिराळा (विनायक गायकवाड) : येथील मारुती रामचंद्र हावळ यांच्या घराची कडी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या दरम्यान तोडून १६ तोळे सोने व रोख १८ हजार रुपये असा मोठा ऐवज लंपास केला. यासह चोरट्यांनी शहरातील इतर तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला.

याबाबत शिराळा पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, गुरुवार पेठ येथील मारुती हावळ यांच्या बंगल्याच्या तळ मजल्याच्या दरवाज्याची कडी तोडून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास बंगल्यात प्रवेश केला. कुटुंबातील सर्व सदस्य वरच्या मजल्यावर झोपायला होते. चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केल्यावर हॉल मध्ये असणाऱ्या कपाटाचे लॉक तोडून आत स्टीलच्या डब्यात असणारे सोन्याचे दागिने व बॉक्स मध्ये असणारा नेकलेस व त्याच कप्यात असलेली रोख रक्कम रुपये १८ हजार असा मोठा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला. यामध्ये ३० ग्रॅमचे घंटन, १० ग्रॅमची चेन, १५ ग्रॅमचा कंडा, ७ ग्रॅमच्या मिळून ३ अंगठ्या, २० ग्रॅमच्या २ बांगड्या, १० ग्रॅमच्या रिंगा, २० ग्रॅमची दोन पदरी १ मोहनमाळ, १० ग्रॅमची एक पदरी मोहनमाळ, १५ ग्रॅमचा नेकलेस, २० ग्रॅमची दोन बिस्किटे या वस्तूंचा समावेश आहे.  
याबरोबरच शेजारी असणाऱ्या सतीश मिरजकर, प्रमोद काकडे यांच्या घरच्या कड्या तोडल्या व तळीच्या कोपऱ्यावर असणाऱ्या श्रावणी ब्युटी पार्लर येथे देखील चोरट्यांनी हात मारण्याच्या प्रयत्न केला. मात्र याठिकाणी त्यांच्या हाती काही लागले नाही. 
---------------------------------------
श्वानपथक घुटमळले....
चोरीच्या घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाने शहराबाहेरील रस्त्यापर्यंत माग काढला आणि तेथेच घुटमळले. परिसरातील सी.सी. फुटेज देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, शिराळा पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी भेट दिली. सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश वाडेकर करत आहेत.

Post a Comment

0 Comments