Daily Mahasatta

Daily Mahasatta

अखंड वीज पुरवठ्यासाठी सब स्टेशन उंचावर उभा करा : पृथ्वीराज पाटील


: ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे पृथ्वीराज पाटील यांची मागणी

सांगली,( प्रतिनिधी)
सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका क्षेत्राला महापुराच्या काळात अखंड पाणी पुरवठा होण्यासाठी ३३/११ केव्हीचे सबस्टेशन जीआयएस पद्धतीचे व्हावे, तसेच ते उंचावर उभा करावे, अशी मागणी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत यांच्याकडे केली.

कृष्णा नदीच्या महापुरात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ना. राऊत हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पाहणीनंतर ना. राऊत यांनी श्री. पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली, त्यावेळी त्यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करू असे ना. राऊत यांनी सांगितले. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम आणि  जितेश कदम उपस्थित होते.

श्री. पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, महापुराच्यावेळी नदीवरील वीज यंत्रणा पाण्याखाली जाते. त्यामुळे सांगली शहराचा पाणीपुरवठा दीर्घकाळ खंडित होतो. त्यामुळे हे सबस्टेशन उंचीवर  जीआयएस पध्दतीचे व्हावे. नदी पात्रातील लाईन ही जुन्या लोखंडी पोलवर असून  पुराच्या वेळेस पाण्याखाली जाते. त्यामुळे पुढील दोन सबस्टेशन्स  बाधीत होतात व वीज कनेक्शन बंद पडते. तरी सदर लाईन ही टॉवर पध्दतीने व्हावी. नदीकाठ व पूरप्रवण क्षेत्रातील ११ केव्ही लाईनची उंची कमी असल्याने पूरकाळात सातत्याने बाधीत होते.  तरी सदर लाईनची उंची वाढविणे अत्यंत गरजेचे आहे.

पुराचे पाणी हे महापालिका क्षेत्रातील गावभाग, कोल्हापूर रोड, आंबेडकर रोड, गणपती पेठ, सराफ कट्टा, कापड पेठ, खाटीक गल्ली, कर्नाळ रोड, स्टेशन चौक, कॉलेज कॉर्नर, बायपास रोड, जुना बुधगाव रोड, शिवाजी मंडई, हरीपूर रोड, शामरावनगर, ट्रक अड्डा या भागात सुमारे ६ ते ७ फुटांपर्यंत पाणी भरते.  त्यामुळे बरीच वीज उपकरणे खराब होतात.  कमी उंचीवर असलेल्या ट्रान्सफार्मरची उंच पोलवर उभारणी करावी.
सांगलीतील व्यापारी एकता असोसिएशन, सर्वपक्षीय कृती समिती, मराठा उद्योजक कक्ष,  कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स, मिरज मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, एमएसईबी कॉन्ट्रक्टर असोसिएशन, कॉंग्रेस मागासवर्गीय सेल, खादीमस युवा वेलफेअर असोसिएशन, टाकळी बोलवाड ग्रामपंचायत यांनीही येथे आपल्या मागण्यांचे निवेदन ना. राऊत यांना दिले. 
------------

Post a Comment

0 Comments