Daily Mahasatta

Daily Mahasatta

खासगी सावकारी प्रकरणी डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल

जत: (सोमनिंग कोळी)
 जत तालुक्यातील बिरनाळ येथील एक खासगी पशू वैद्यकीय डाॅक्टर व त्यांच्या वडीलाविरोधात जत पोलीसांत सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या दोघांविरोथात आणखी चार शेतकऱ्यांनी लेखी तक्रारी दिल्या आहेत.  बिरनाळ येथे मोठ्या प्रमाणात खासगी सावकारी सुरू असून या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. 

जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षीत गेडाम यांनी जिल्ह्यातील सावकारी विरोधात जोरदार अभियान सुरू केले आहे.  या पार्श्वभूमीवर जत पोलीसांत बिरनाळ येथील खासगी पशू वैद्यकीय डाॅक्टर कुमार काशीराम बंडगर व त्याचा वडील काशीराम बंडगर यांच्या विरोधात जत पोलीसांत सावकारी अधिनियम कलम 39 व कलम 45, भादवी कलम 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रामदास महादेव लोहार राहणार बिरनाळ या शेतकऱ्याने जत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की कुमार काशिराम बंडगर व काशीराम आबा बंडगर यांच्याकडून घरगुती अडचणी साठी 2011साली दीड लाख रुपये दोन टक्के व्याजाने घेतले होते. व्याजाच्या रकमेपोटी माझी मालकीची शेत जमीन काशीराम बंडगर यांनी खुश खरेदी लिहून घेतले आहे. 

मात्र कुमार याने स्वतःच्या नावावर सदरची जमीन बक्षीस पत्र करून घेतली आहे. मागील चार वर्षापासून जमीन फिरवून माझ्या नावावर करावी, अशी वेळोवेळी मागणी केली मात्र कुमार बंडगर यांनी व्याजासह एकूण रक्कम 26 लाख रुपये झाले आहेत, ते द्या मगच जमीन परत देतो, असे सांगितले त्यामुळे रामदास लोहार यांनी जत पोलिसात तक्रार दिली आहे.

कुमार काशिराम बंडगर या सावकारा विरोधात जत पोलिस ठाण्यात आणखी चार अर्ज देण्यात आले आहेत. विलास श्रीरंग जानकर, भारत श्रीरंग जानकर व श्रीरंग लिंबाजी जानकर यांनीही सावकारीच्या व्याजापोटी व रकमेपोटी कुमार बंडगर याने जमीन खरेदी करून घेतली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बिरनाळ गावातील गुंडा बिरा बंडगर यांनी काशीराम बाबा बंडगर, कुमार काशिराम बंडगर, प्रथमेश कुमार बंडगर, उत्कर्ष कुमार बंडगर यांच्या विरोधात खाजगी सावकारीची तक्रार दिली आहे. या चौघांनी दोन लाख पाच हजार रुपये व्याजाने दिले होते. त्याच्या मोबदल्यात जमीन लिहून घेतली आहे. मात्र आता व्याजासह 35 लाख रुपयांची मागणी करीत आहेत. असे तक्रारीत म्हटले आहे.

बिरनाळ गावातील सुवर्णा लक्ष्मण जानकर या शेतकरी महिलेने कुमार काशिराम बंडगर व काशीराम आबा बंडगर यांच्याविरोधात जत पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की माझ्या पतीने दोन्ही सावकाराकडून तीन लाख दहा हजार रुपये व्याजाने घेतले होते. सदर रकमेच्या व्याजापोटी दरवर्षी 72 हजार रुपये दिले आहेत  मात्र सदर सावकाराने खरेदी करून घेतलेली जमीन परत देण्यासाठी आता व्याजासह तीस लाख रुपयांची मागणी केली आहे. 

माळाप्पा आनंदा जानकर या शेतकऱ्याने ही कुमार बंडगर व काशिराम बंडगर या दोघा सावकारांच्या विरोधात अशाच स्वरूपाची तक्रार जत पोलीस ठाण्यात दिली आहे. जत पोलिसांनी एकाच प्रकरणात गुन्हा दाखल केला असून पोलीस सदर सावकारावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे यासंदर्भात सावकारी विरोधात जिल्हा पोलीस प्रमुख यांनी नेमलेल्या पथकाने तातडीने सदर सावकाराचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे

Post a Comment

0 Comments