Daily Mahasatta

Daily Mahasatta

पत्नीसह शेजाऱ्यावर तलवार हल्ला; पतीची आत्महत्या

इस्लामपूर ( सुर्यकांत शिंदे)

पत्नी बरोबर झालेल्या भांडणात तिच्यावर खुनी हल्ला करून भांडण सोडवण्यासाठी आलेल्या शेजाऱ्यावरही तलवारीने हल्ला करुन पतीने स्वतः आत्महत्या केल्याची घटना आज वाळवा तालुक्यातील तुजारपूर येथे घडली. पांडूरंग बाबुराव यादव-सासणे (वय-६०) असे हल्लेखोर व आमहत्या करणाऱ्याचे नाव आहे.

या हल्ल्यात मृत पांडुरंग यांची पत्नी लक्ष्मी सासणे-यादव (वय ५५), शेजारी वसंत बाबुराव पवार (वय ५५)  हे जखमी झाले आहेत. आज बुधवारी (ता. २१) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृताचे चुलत भाऊ सर्जेराव विष्णू सासणे (वय ५४, रा. तुजारपूर) यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की  पांडुरंग यादव-सासणे व त्यांची पत्नी लक्ष्मी यांच्यात आज सकाळी भांडण सुरू होते. पत्नीवर तलवारीने खुनी हल्ला केल्याचे पाहून शेजारी वसंत पवार ते भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यानंतर शेजारी वसंत पवार व पत्नी  लक्ष्मी या दोघांच्यावर तलवारीने हल्ला करत गंभीर जखमी केले. दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

पांडुरंग यादव-सासणे हा तुजारपूर सोसायटीचा माजी अध्यक्ष आहे. तो सकाळी पत्नीला मारहाण करीत होता. शेजारी पवार यांनी हस्तक्षेप करत  पत्नीला का मारत आहेस, असे विचारले असता, त्यांच्याही डोक्यात त्याने तलवारीने हल्ला केला. त्यानंतर पांडुरंग घाबरून घराचा आतून दरवाजा लावून लपून बसला. पांडुरंगचे चुलत भाऊ फिर्यादी सर्जेराव सासणे यांनी त्याला बाहेर बोलावण्याचा प्रयत्न केला; परंतु तो बाहेर आला नाही. त्यानंतर सर्जेराव सासणे यांनी खिडकीतून आत पाहिले असता पांडुरंगने बाथरूमच्या वरती स्लॅबच्या बिमला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. घटनेची नोंद इस्लामपूर पोलीस ठाण्यात झाली आहे.

Post a Comment

0 Comments