Daily Mahasatta

Daily Mahasatta

जत मधील व्यापारी रस्त्यावर, दुकाने उघडण्यास परवानगीची मागणी

जत ,(सोमनिंग कोळी )

- लाॅकडाऊनमुळे आमचे जगणे मुश्किल झाले असून आमचे हाल सुरू आहेत. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला दुकाने उघडून व्यापार करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी जत व्यापारी असोसिएशनने तहसिलदार जत यांच्याकडे   केली .आज जत येथिल शेकडो व्यापारी आपली दुकाने दोन महिने झालीतरी अजून उघडण्यास व व्यवसाय करणेस प्रशासन परवानगी देत नसल्याने तहसिलदार कार्यालयासमोर जमा झाले होते.व आम्हाला दुकाने उघडण्यास परवानगी द्या अशी घोषणा देत होते.

   जत येथिल प्रमुख बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापना या सुरू आहेत.परंतु स्टेशनरी दुकाने,इलेक्ट्रॉनिक दुकाने,सराफी दुकाने,भांड्याची दुकाने, कापड व्यापारी तसेच रेडीमेड कापड व्यापारी यांच्या अस्थापना बंद असल्याने त्यांना दुकानाचे भाडे,विज बिल, कामगारांचा पगार, पतसंस्था व बॅंकेचे व्याज त्याचप्रमाणे घरखर्च चालविणे ही कठीण झाले आहे. त्यामुळे हे सर्व व्यापारी आज रस्त्यावर आले होते.

     जत शहरातील व्यापारीबंधू कोरोनाचे पार्श्वभूमीवर प्रशासनाला चांगल्या प्रकारे सहकार्य करित आले आहेत. कोरोनाचे नियमांचे पालन करित आहेत. परंतु वरचेवर लावण्यात येत असलेल्या लाॅकडाऊनमुळे आमचे फार हाल सुरू आहेत.आम्हाला जगणे मुश्किल झाले आहे .अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने गेली दोन महिने सुरू आहेत परंतु आमची दुकाने बंद आहेत.अशा प्रतिक्रिया व्यापारी बांधवानी व्यक्त केल्या .

   आम्हाला आमची दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. प्रशासनाच्या नियमानुसार दुकाने  सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश आहेत.तरी आम्हालाही सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी.

अत्यावश्यक सेवेतील दूकाने उदा.किराणा दूकाने दररोज काय किराणा लागत नाही. त्यामुळे एक दिवस किराणा व अत्यावश्यक सेवेतील दूकाने बंद ठेवून आम्हाला दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. अशाच प्रकारे फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहील्यास आम्ही  दररोज जत तहसिलदार कार्यालयासमोर भिक मागो आंदोलन सुरू करणार आहोत.तरी प्रशासनाने आमच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करावा व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी ही व्यापारी असोसिएशनने  तहसिलदार जत यांच्याकडे केली आहे.

   या वेळी बोलताना व्यापारी असोसिएशनजत चे अध्यक्ष किरण बिज्जरगी म्हणाले की, प्रशासनाने आम्हाला दि.१९ जुलैपासून तुम्हाला तुमची दुकाने उघडण्यासाठी सहकार्य करू असे अश्वासन दिले होते. परंतु प्रशासनाने आपले अश्वासन पाळले नाही. प्रशासनाचे धोरणानुसार केवळ आमची दुकाने बंद ठेवल्याने कोरोना आटोक्यात येत असेल तर मग कोरोनाची संख्या का वाढत आहे. प्रशासनाला कोरोनाचे नावाखाली गोरगरिब दुकानदारांना छळायचे आहे.

प्रशासनाच्या नियमानुसार नियमाचे पालन न करणारे  दुकानदाराला केवळ हजार रूपयांचा दंड भरावा लागत असताना जत नगरपरिषद मात्र व्यापारी यांच्याकडून पाचहजार रूपये,दहाहजार रूपये असे दंड लावून आधीच लाॅकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या व्यापारी बांधवाना आणखी अडचणीत आणण्याचे काम करित आहेत. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. जर प्रशासनानाला कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करायचा असेलतर प्रशासनाने सर्वच अस्थापना बंद ठेवाव्यात तरच कोरोना नियंत्रणात येईल असेही किरण बिज्जरगी म्हणाले.

या आंदोलनामध्ये  जत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किरण बिज्जरगी, व्यापारी व नगरसेवक ईराण्णा निडोणी,कापड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग बामणे, सराफ असोसिएशनचे प्रकाश बंडगर, भांडी व्यापारी जितेंद्र पाचंगे यांच्यासह शेकडो व्यापारी सहभागी झाले होते.

या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हाध्यक्ष संजयरावजी कांबळे ,जत नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत, आदीनी उपस्थित राहून पाठींबा व्यक्त केला.या वेळी जतचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यानी आंदोलन ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

  यावेळी तहसिलदार सचिन पाटील यांनी निवेदन स्विकारले व प्रशासन व्यापारी बांधवांच्या व्यथा समजू शकतो. त्यामुळे जतचे प्रांताधिकारीसाहेब हे व्यापारी बांधवांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात लवकरच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन समिती अभिजीत चौधरीसाहेब यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढतील असे अश्वासन व्यापारी बंधूना दिले.

Post a Comment

0 Comments