Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसची सायकल यात्रा

सांगली, (प्रतिनिधी) : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस,  खाद्यतेल तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आहेत. ही दरवाढ कमी करून सर्वसामान्य माणसांना न्याय द्यावा या मागणीसाठी सांगली शहर व ग्रामिण जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने कृषी व सहकार राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम, ग्रामिण जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, निरीक्षक संजय बालगुडे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सांगली शहरातून सायकल यात्रा काढली. 

सायकल यात्रेची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून झाली तेथून राम मंदिर, पंचमुखी मारुती रोड, मारूती चौक, बालाजी चौक, भारती विद्यापीठ मार्गे स्टेशन चौकातून ही यात्रा काढण्यात आली. मोदी सरकार पुन्हा नको,  अशा घोषणा देत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी  ना. विश्वजीत कदम म्हणाले, केंद्रात बसलेल्या मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. देशाच्या आणि जगाच्या इतिहासात पेट्रोल आणि डिझेलचे दर १०५ ते १०७ रुपये प्रति लिटर झाले आहेत. गॅस ८०० ते ९०० रुपयांवर गेला आहे. अन्य जीवनावश्यक वस्तूही महागल्या आहेत. उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना जगणे मुश्कील झाले आहे. केंद्राने पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर कमी करून लोकांना दिलासा द्यायला हवा होता, परंतु तो दिला नाही. त्यामुळे जनतेचा आक्रोश सुरू आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने या महागाई विरुद्धचा लढा चालू केला आहे. 

यावेळी सायकल रॅलीत सांगली जिल्हा प्रभारी तौफिक मुलाणी, डॉ. जितेश कदम, सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी जयदीप शिंदे, बिपीन कदम, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण, उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक, संजय मेंढे, अभिजित भोसले, संतोष पाटील अमर निंबाळकर, महेश साळुंखे, रविंद्र वळवडे, जि. प. सदस्य विशाल चौगुले, प्रमोद सुर्यवंशी, सनी धोतरे, तौफिक शिकलगार,  आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments