Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात निर्बंध कठोर करा - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली, ( प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या धोरणानुसार १० टक्के पेक्षा कमी कोविड-१९ पॉ‍झिटीव्हीटी दर आल्याशिवाय सद्यस्थितीत निर्बंधामध्ये शिथीलता आणता येणार नाही. त्यामुळे हा दर कमी करण्यासाठी सर्वांनी सर्वोतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी सद्यस्थितीतील  प्रतिबंधात्मक निर्बंधांची यंत्रणांनी कठोर अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अधिष्ठाता सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे आदि उपस्थित होते.

जिल्ह्यात सद्या प्रतिदिन १३ ते १४ हजारापर्यंत कोविड चाचणी होत असून १० हजार रूग्ण कोरोना बाधीत आहेत. रूग्ण बरे होण्याचा दर ९१ टक्के आहे. सांगली जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणीनुसार कोविड-१९ पॉझिटीव्हीटी दर जवळपास १० टक्क्यापर्यंत आहे. सद्यस्थितीत स्तर ४ चे निर्बंध सुरू आहेत. यामध्ये  शिथीलता आणण्यासाठी हा दर कमी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी निर्बंधांची अधिकाधिक आणि काटेकोर अंमलबजावणी सर्व स्तरांवर करण्यात यावी. रस्त्यावरील गर्दी कमी व्हावी, दोन दिवसानंतर भाजीपाला घरपोच पोहोचविण्यावर भर द्यावा. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करावी. अनेक लग्न समारंभामधून मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते, ती गर्दी नियंत्रणात आणावी. ज्या गावांमध्ये लग्न समारंभ आहे त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला याबाबत माहिती कळवावी. खाद्य पदार्थांच्या गाड्यावरील गर्दीही नियंत्रित करावी. गर्दी होणाऱ्या वेळी पोलीसांनी कठोर आणि काटेकोर फिल्ड वर्क करावे.  सर्व मार्गांनी सद्याचा कोरोना पॉझिटीव्हीटी दर कमी करावा, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. 
  
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments