Daily Mahasatta

Daily Mahasatta

डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते

कडेगांव (सचिन मोहिते) : कृष्णा कारखाना ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य शासनाने  कारखान्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.  त्यामुळे सतत कारखाना चांगला चालविल्याचा डांगोरा पिटणाऱ्या तसेच विक्रमी दर दिला म्हणून पोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले असल्याचे मत यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी अंबक, चिंचणी, पाडळी येथील सभासद बैठकीत बोलताना व्यक्त केले.
   
आमच्या सत्ता काळात आम्ही ऊस उत्पादकांना एफआरपी पेक्षा सातशे ते आठशे रुपये जादा दर दिला. वेळेत ऊसतोडी दिल्या. त्याऊलट सत्ताधाऱ्यांनी ऊस उत्पादक सभासदांना अक्रियाशील ठरवुन कारखाना खासगी करण्याचा घाट घातला आहे. सभासदांनी डॉ. भोसलेंची ही चाल ओळखून संस्थापक पॅनेलच्या उमेदवारांना विजयी करून कारखाना खासगी होण्यापासून वाचवावा.
आम्ही सत्तेवर येताच सभासदांना गट  ऑफीसवर मोफत साखर देवू  कारखान्याची खते बांधावर पोहोच करु. कृषीविषयक शिबीराच्या माध्यमातून एकरी उत्पन्न वाढीस चालना देणाऱ्या ज्ञान, तंत्रज्ञानाचा शेतीसाठी वापर करू. पहिल्या दिवसापासून घाटमाथ्यावरील ऊसतोडीस प्राधान्य देवू. सभासदांच्या आरोग्यासाठी शिबिरे घेऊ, दुर्धर व्याधीसाठी भरीव स्वरूपाची आर्थिक मदत करू. अक्रियाशील केलेल्या सभासदांचे पुनरावलोकन करून त्यांना  पुन्हा कारखान्याचे सभासद करून घेवू असेही अविनाश मोहिते म्हणाले. 

पुढे ते म्हणाले की भाऊ, आप्पांच्या डॉक्टर मुलांना खासगीकरणाचे प्रचंड वेड आहे. डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी कारखान्याच्या दीडशे एकरच्या आसपास जमीनी तसेच कृषी कॉलेज स्वःतच्या मालकीचे केले होते. ते आपण न्यायालयीन लढा लढून पुन्हा कारखान्याच्या मालकीचे केले असल्याचे सांगून डॉ. इंद्रजित मोहिते यांना मदत म्हणजे डॉ. भोसले यांना कृष्णा कारखाना खासगी करण्यासाठी मदत केल्यासारखे होणार आहे, कारखान्याचे खासगीकरण रोखण्यासाठी सभासदांनी दोन्ही डॉक्टरांना सत्तेपासून दूर ठेवावे असे आवाहन अविनाश मोहिते यांनी केले आहे.

यावेळी माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील, बाबासाहेब पाटील( येडेमच्छिंद), माणिकराव मोरे (देवराष्ट्रे), कडेगांव तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष पृथ्वीराज कदम(सोनकिरे), दिनकर कोळेकर, रामचंद्र पवार(पाडळी), क्रांतीचे माजी संचालक  नारायणराव पाटील, संतोष माने(अंबक), प्रमोद पाटील, वैभव पवार, सद्दाम मुल्ला (चिंचणी), मधुकर डिसले, जयवंतराव मोरे( किल्लेमच्छिंद्रगड) आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments