Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोना पॉझिटिव्ह महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती, आरोग्य सेविकांच्या धाडसाचे कौतुक

मांगले (राजेंद्र दिवाण) : कोरोना महामारीच्या काळात  मांगले प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका स्वाती एस. माने व सारिका संजय कांबळे या दोन आरोग्य सेविकांनी जीवाची पर्वा न करता कोरोना पॉझिटिव्ह महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती करण्याचे धाडस केले.

मांगले गावातील महिलेला त्रास होऊ लागल्या नंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र घड्याळे व डॉ. जयसिंगराव पवार यांनी महिलेची कोरोना अँटीजेन तपासणी केली. त्या तपासणीत संबंधित महिला पॉझिटिव्ह आली. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र घड्याळे यांनी त्या महिलेला मिरज येथील मिरज मेडीकल हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध करून घेवून रुग्णवाहिकेतून मिरजेला हलविण्याची व्यवस्था केली. 

रूग्ण वाहिका चालक सचिन बोने व दोन आरोग्य सेविका सकाळी साडे नऊ च्या दरम्यान मांगले येथून सदर महिलेला घेऊन रुग्णवाहिका मिरजेला निघाली होती. सांगलीच्या जवळ आल्यानंतर सकाळी साडेदहा वाजता महिलेला प्रसूतिच्या वेदना चालू झाल्या.  त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या आरोग्य सेविका एस. एस. माने व सारिका संजय कांबळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता धाडसाने सदर महिलेची प्रसूती रुग्णवाहिकेतच केली, महिलेला मुलगा झाला. रुग्णवाहिकेत प्रसूतीचे संपूर्ण किट घेतले असल्यामुळे प्रसुती वेळी अडचण आली नाही. त्यानंतर मिरज मेडिकल हॉस्पिटल येथे सदर महिला बेड उपलब्ध होता त्या ठिकाणी पोहोचवून रुग्णवाहिका परत आली. या दोन्ही आरोग्य सेविकांच्या धाडसाचे परिसरात कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments