Daily Mahasatta

Daily Mahasatta

केंद्र सरकारने कराच्या माध्यमातून कोट्यावधीची लुट केली: जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील

सांगली : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.

सांगली, (प्रतिनिधी) : केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या अन्यायी दरवाढीविरोधात सांगली शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने सांगली, माधवनगर, नांद्रे आणि बालाजीनगर येथे सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली घोषणा देत तीव्र आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाविषयी बोलताना श्री. पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले की, पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरवाढीविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलवर भरमसाठ कर लादून लाखो कोटी रुपये लुटले आहेत. सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे. 

ते म्हणाले, केंद्रातील पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे, त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे. 


ते म्हणाले, यूपीए सरकारच्या काळामध्ये पेट्रोलवर एक्साईज ड्युटी ९.४८ रुपये होती, ती आज ३२.९० रुपये म्हणजे २५८% वाढ. डिझेलवरील एक्साईज ड्युटी ३.५६ रुपये होती, ती ३१.८० रुपयांवर गेली आहे म्हणजे ८२०% वाढ झाली आहे. एक्साईज ड्युटीतून मोदी सरकारने गेल्या ७ वर्षांत तब्बल २० ते २५ लाख कोटी रुपयांची लुटमार केली आहे. 


सन २००१ ते २०१४ या चौदा वर्षाच्या काळात पेट्रोल डिझेलवर प्रति लिटर १ रुपया सेंट्रल रोड फंड सेस लावला जात होता. २०१८ मध्ये १८ रु. प्रतिलिटर केला. केंद्रात डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित युपीएचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरपेक्षा जास्त प्रती बॅरल असतानाही देशांतर्गत किमतीवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जवळपास ६४ डॉलर प्रति बॅरल एवढ्या कमी असतानाही पेट्रोल-डिझेलचे दर भरमसाठ वाढवलेले आहेत, हे निषेधार्ह आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.


मार्केट यार्ड येथील पेट्रोल पंपावर झालेल्या आंदोलनात नगरसेवक अभिजीत भोसले, संतोष पाटील, प्रा. नेमिनाथ बिरनाळे, इलाही बारुदवाले, अल्ताफ पेंढारी, देशभूषण पाटील, अजित ढोले, सिद्धार्थ माने, मौला वंटमुरे, नामदेव पठाडे, बाबगोंडा पाटील, भाऊसाहेब पवार, पैगंबर शेख, आयुब निशाणदार, सागर काळे, प्रतिक्षा काळे, अमित पारेकर, अशोक रासकर, याकूब मनेर, प्रशांत देशमुख, आशिष चौधरी, प्रशांत अहिवळे, जावेद मुल्ला, टिपू बारगीर, हिरा कांबळे यांचा सहभाग होता.

Post a Comment

0 Comments