Daily Mahasatta

Daily Mahasatta

आईच्या डोळ्यासमोर टेम्पो खाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू

इस्लामपूर (सूर्यकांत शिंदे) : शिवपुरी (ता. वाळवा) येथे आईबरोबर पाणी  आणण्यासाठी जाणाऱ्या ७ वर्षाच्या बालकाचा टेम्पो खाली सापडून दुर्दैवी अंत झाला. नरसिंग गोविंद जाधव (वय ७) असे त्या बालकाचे नाव आहे. आईच्या डोळ्यादेखतच ही घटना घडल्याने आईने हंबरडा फोडला. ही घटना आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी टेम्पोचालक अर्जुन सदाशिव पाटील( वय ४०, रा. कार्वे, ता. वाळवा) याच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत घटनेची अधिक माहिती अशी, की आज सकाळी नरसिंग व त्याचे आणखी दोन भाऊ आईबरोबर पाणी आणण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे निघाले होते. त्यावेळी आईने लहान व मोठ्या मुलांबरोबर रस्ता पार केला. मधला मुलगा नरसिंग मागेच राहिला. आईचे त्याच्याकडे लक्ष गेले परंतु तेवढ्यातच रस्त्यावरून समोरच्या दिशेने भरधाव वेगाने येणारा चारचाकी टेम्पो दिसला. टेम्पो येतोय हे लक्षात येताच आईने टेम्पोला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी नरसिंग रस्ता पार करण्यासाठी पुढे येत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोच्या चाकाखाली आला. जोराची धडक बसल्याने नरसिंग जागीच मृत्यू पावला. डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याने आईने जाग्यावरच हंबरडा फोडला.

या बाबतची फिर्याद मृत नरसिंगचे वडील गोविंद रंगापा जाधव (वय ४०, मूळ रा. बारानंबरपाटी, जिल्हा लातूर, सध्या रा. वाघवाडी, ता. वाळवा) यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

Post a Comment

0 Comments