Daily Mahasatta

Daily Mahasatta

मुक्तांगणचा पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार,पाच वर्षात २१ हजार सीड बॉलची निर्मिती

इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूलच्या आवारात सीड बॉल बनविण्यारे माजी विद्यार्थी - पालकांचे कुटुंब ...

इस्लामपूर (सुर्यकांत शिंदे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतां नागरिकांना ऑक्सिजनचे महत्त्व पटू लागले आहे. वातावरणात नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीसाठी वृक्ष लागवड व संवर्धन गरजेचे बनले आहे. इस्लामपुरातील मुक्तांगण प्ले स्कूल तर्फे पर्यावरण संवर्धनासाठी गेली पाच वर्षे प्रयत्न केले जात आहेत. तब्बल १६ हजार सीड बॉल निसर्गाच्या कुशीत टाकण्यात आले आहेत. यंदा पर्यावरण 
दिनाचे औचित्य साधून तब्बल दोन हजार सीड बॉल बनवण्यात आले आहेत. येत्या आठवड्यात पाच हजार सीड बॉल बनविण्यात येणार आहेत. मुक्तांगणने पर्यावरणप्रेमींमध्ये आदर्श निर्माण केला आहे.

इस्लामपुरातील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात सहा वर्षाच्या आतील मुलांना खेळातून शिक्षण दिले जाते. पाच जूनला सर्वत्र पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो.या निमित्ताने सामजिक बांधिलकी म्हणून सीड बॉल बनविण्याच्या उपक्रम राबविण्यात आला. माती, शेण आणि पाण्याचे मिश्रण केले.चिखलाचे गोळे करून त्यात विविध फळ बिया आणि सावली देणाऱ्या झाडाच्या बिया घातल्या.हाताने गोल आकार  सीड बॉल बनविले गेले. गेल्या चार दिवसांपासून मुक्तांगण प्ले स्कूलच्या आवारात हा उपक्रम घेण्यात आला. कोरोनामुळे स्कूल बंद आहेत. त्यामुळे काही पालकांनी एकत्रित हे सीड बॉल बनविले.
दोन दिवसांपासून तालुक्यातील विविध डोंगरावर हे  सीड बॉल फेकण्यात येत आहेत. 

चिंचोके,जांभूळ,पपई ,फणस, बहावा,गुलमोहर,रानटी बाभूळ आदी आणल्या होत्या. लहान मुले, महिलां पालकांसह माजी विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सहभाग नोंदवत सीड बॉल बनविण्यासाठी उत्साहाने सहभागी घेतला. मुलांनी  माती आणि शेण समप्रमाणात घेऊन एकजीव केले. त्यात विविध देशी झाडांच्या बिया घालून छोट्या बॉलसारखे गोळे तयार करण्यात आले. वर्षाराणी  मोहिते यांनी सीड बॉल बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.

वाळलेले सीड बॉल निसर्ग भ्रमंती, ट्रेकींग आणि सहलीदरम्यान मुलांच्या मार्फत टाकण्यात येणार आहेत. हे बॉल फुटून बियांना अंकुर येईल आणि त्या रोपांचे झाडात रुपांतर होईल अशी ही संकल्पना असल्याचे मुक्तांगणचे सचिव विनोद मोहिते यांनी सांगितले. 

निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने कृतीशील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मुक्तांगण मध्ये लहान मुलांना प्रत्यक्ष अनुभव देत शिक्षण दिले जाते. पर्यावरण ,निसर्गाच्या सानिध्यात मुले चांगली रमतात.यामुळेच लहानपणीच पर्यावरणाच्या रक्षणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. वर्षभर  पर्यावरणाच्या बाबत अनेक उपक्रम घेऊन मुलांच्या जडणघडणीत नवनव्या गोष्टी बिबवल्या जातात. या उपक्रमाला माजी विद्यार्थ्यांच्या पालकांनी सहकार्य केले.पावसाळ्यात हे बॉल विविध ठिकाणी फेकून दिल्यावर बियांचे रोपण होईल अन् वृक्ष वाढतील अशी भूमिका आहे.

Post a Comment

0 Comments