Daily Mahasatta

Daily Mahasatta

कृष्णा कार्यक्षेत्रात क्षारपड जमीनीची सुधारणा करणार : अविनाश मोहिते

वाळवा (रहिम पठाण) : कारखान्याची स्थापना झाल्यापासुन कारखाना कार्यक्षेत्रात सातत्याने ऊस पीक घेतले गेल्याने, अति पाण्याच्या वापराने जमीनी क्षारपड झाल्या आहेत. जमीनीचा पोत सुधारून शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढावे यासाठी आपण सत्तेवर येताच कारखाना कार्यक्षेत्रात क्षारपड जमीन सुधारणेचा कार्यकम हाती घेणार असल्याची घोषणा कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे झालेल्या संस्थापक पॅनेलच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना केली.

मोहिते म्हणाले, क्षारपड जमीन सुधारणेच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या पडीक जमीनी हाताखाली येणार असलेने जमीनीचा पोत सुधारुन एकरी टनेजचे उत्पादन वाढणार आहे. त्याचा फायदा कृष्णेच्या सभासदांना होऊन त्यांच्या आर्थिक परिस्थितीत झपाट्याने बदल होईल. एकरी किमान शंभर टन उत्पादन निघावे यासाठी ठिबक सिंचनच्या वापर करून सुधारित शेतीसाठी शेतकऱ्यांना पाठबळ दिले जाईल. त्याकरिता आपण मास्टर प्लॅन तयार केला आहे. पहिल्याच मिटींगमध्ये आठ हजार मयत सभासदांचे शेअर्स त्यांच्या नांवे करणार असल्याचेही मोहिते यांनी स्पष्ट केले.

यावर्षी भोसले यांनी कृष्णेची एम प्रतीची साखर प्रति क्विंटल तीन हजार रुपयांचे टेंडर काढून विकली आणि  जयवंतची साखर ३१५० रुपयांनी विकली. कृष्णेच्या बारा  लाख क्विंटल साखरेची प्रति क्विंटल दीडशे रुपये प्रमाणे होणाऱ्या फरकाची १८ कोटीची रक्कम डॉ. सुरेश भोसले यांनी आपल्या घशात घातली असल्याचा आरोप मोहिते यांनी यावेळी केला.

बंडानाना जगताप म्हणाले, डॉ. इंद्रजित मोहिते मते मागण्यासाठी आल्यानंतर त्यांची गाडी अडवून पत संस्थेतील आमच्या ठेवीचे काय केले याचा जाब विचारा. डॉ. भोसले यांनी आजअखेर सहा हजार सभासदांना अक्रियाशील केले आहे, त्यांच्या हाती पुन्हा सत्ता गेली तर पंचवीस हजार सभासदांचे सभासदत्व रद्द करून कृष्णाचे ते खासगीकरण करणार आहेत. त्यासाठी त्यांनी पेठ येथे युनायटेड शुगर नावाने खासगी साखर कारखान्याचा परवाना घेतला आहे.

अजित पाटील चिखलीकर म्हणाले, देशाला स्वातंत्रय मिळविण्यासाठी क्रांतीसिंह नाना पाटील यांनी 'चले जाव' म्हणून इंग्रजांना हाकलून लावले, त्यापमाणे कृष्णा कारखाना वाचवायचा असेल तर 'भोसले हटाव, कृष्णा बचाव' या धोरणाची अंमलबजावणी करावी लागेल.
यावेळी माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील, बंडानाना जगताप, अजित पाटील, बाबासाहेब पाटील, माणिकराव मोरे, महेश पवार, भरत कदम, सुभाष शिंदे, डॉ. जयकर शिंदे, सुधिर रोकडे, गजानन पाटील, दिनकर सावंत, सुरेश पाटील, अॅड. माणिकराव कुलकर्णी, अमोल पाटील, बाजीराव रसाळ, पंडीत माळी, आनंदराव जगताप, जयवंतराव मोरे, धनाजी साळुंखे, मधुकर डिसले, गोरख पाटील, बाजीराव रसाळ, पोपटराव कदम, सुभाष शिंदे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments