Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात लाॅकडाऊन संपला?उद्घाटनाचे उडाले बार...

उद्घाटनाचे उडाले बार...

सांगली (राजेंद्र काळे) : सांगली जिल्ह्यासह विटा परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच असून कोरोना ने जिल्ह्यात दररोज ३० ते ४० लोकांचा बळी जात आहे. अशा भीषण संकटात विटा नगरपालिकेच्या कारभार्यांनी लाॅकडाऊनचे नियम अक्षरशः पायदळी तुडवित रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनाचा बार उडवून दिला आहे. त्यामुळे विटा शहरातील लाॅकडाऊन संपला आहे का ? इथून पुढे सामान्य नागरिकांवरील कारवाई थांबणार का ? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

विटा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अॅड वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली विटा पालिकेने कोव्हीड सेंटर उभारत कोरोनाच्या संकटात विट्यासह तालुक्यातील लोकांना मोठा दिलासा दिला आहे. विटा पालिकेच्या माध्यमातून त्यांनी कोरोना च्या संकटात नेहमीच लोकोपयोगी उपक्रम राबविले. मात्र त्यांच्या पहिल्या, दुसर्या फळीतील कार्यकर्ते मात्र चमकोगिरी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालिकेच्या कारभारावर पुन्हा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. 

विटा पालिकेतील प्रभाग ३ मध्ये वासुंबे रोड ते खानापुर रोड या नविन रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमास युवा नेते माजी नगराध्यक्ष अॅड वैभव पाटील, नगराध्यक्षा सौ प्रतिभाताई पाटील, उपनगराध्यक्षा सारिकाताई सपकाळ, माजी उपनगराध्यक्ष किरणभाऊ तारळेकर अशी पालिकेतील दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. आगामी नगरपरिषद निवडणूक तोंडावर आल्यामुळे हा उद्घाटन सोहळा दणक्यात करण्याचे स्थानिक नेत्यांनी ठरवल्याचे समजते.

कोरोना च्या संकटात लग्न किंवा अंत्यविधीसाठी देखील गर्दी जमवण्यास बंदी असताना, तसेच याबाबतची पूर्णतः माहिती असताना देखील पालिकेच्या कारभार्यानी चक्क शेकडो लोकांचा जमाव जमवून रस्त्याचा दिमाखदार शुभारंभ केला. विटा शहरात लाॅकडाऊन च्या नियमांचा भंग करणार्यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची ज्या पालिका प्रशासनाची जबाबदारी आहे, त्या पालिकेच्या कारभार्यानी असे लाॅकडाऊनच्या नियमांचा भंग करत उद्घाटन सोहळे घेणे निश्चितच चिंताजनक आहे. 
----------------------------------------
दादा-भाऊ जरा दमानं...
माजी नगराध्यक्ष अॅड वैभव पाटील आणि माजी उपनगराध्यक्ष किरणभाऊ तारळेकर ही सत्ताधारी गटातील अनुभवी जोडी आहे. या नेत्यांचे अनुकरण बाकीचे नगरसेवक, कार्यकर्ते करतात. अजून विटा शहरातील कोरोना चे संकट गेलेले नाही. दररोज शहरात तीन पेक्षा अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी जात आहे. अशावेळी वैभवदादा आणि किरणभाऊ यांनी कार्यकर्त्यांना दमानं घेण्याच्या सुचना कराव्यात. कोरोना च्या भीषण संकटात पालिकेने सर्वोत्तम कामगिरी केली आहे, त्याला हौसी कार्यकर्त्यांनी गालबोट लावू नये, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments