Daily Mahasatta

Daily Mahasatta

कलाकारांचे दुःख कलाकारच जाणू शकतो : अभिनेते विजय पटवर्धन

मांगले (राजेंद्र दिवाण) : कोरोनाच्या कठीण काळात  अडचणीत असणाऱ्या आपल्या बांधवांना फुल ना फुलाची पाकळी मिळावी यासाठी आम्ही फक्त माध्यम म्हणून काम केले. मात्र देव करो अशी मदत करण्याची वेळ पुनः कोणावर येऊ नये असे प्रतिपादन फु बाई फु फेम अभिनेते विजय पटवर्धन यांनी केले.

मांगले (ता.शिराळा) येथे विजय पटवर्धन, राजू बावडेकर कलाकार मित्र परिवाराच्या माध्यमातून शिराळा तालुक्यातील कलाकारांना जीवनावश्यक वस्तू वाटप प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार व्ही.डी.महाजन होते. मिसेस मुख्यमंत्री फेम नरसू मामा अभिनेते राजू बावडेकर, माजी सरपंच विजय पाटील व लेखक-दिग्दर्शक वैजनाथ चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
अभिनेते विजय पटवर्धन म्हणाले, कोरोनाच्या काळात कलाकारांना काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या कठीण काळात त्यांना थोडाफार मदतीचा हात मिळावा म्हणून वैजनाथ चौगुले यांनी प्रयत्न करून ही मदत मिळवून दिली आहे.
          
अभिनेते राजू बावडेकर म्हणाले, ग्रामीण भागातील कलाकारांच्या यातना व व्यथा मी जवळून अनुभवल्या आहेत. या भागात वैजनाथ चौगुले यांच्यामुळे अनेक वेळा चित्रीकरणाच्या निमित्ताने येण्याचा योग आला. या तालुक्यात चांगले कलाकार आहेत. त्यांना चांगले व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न वैजनाथ चौगुले करत आहेत. आणि या ओळखीतून त्यांनी अडचणीच्या काळात आमच्या ग्रामीण भागातील कलाकार बांधवांना मदत करण्याचा आग्रह धरल्याने हा किट वाटण्याचा आम्हाला योग आला. यावेळी युवा उद्योजक विजय पाटील, अनंत सपकाळ, भीमराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी मंडल अधिकारी राजेंद्र खैरे, सुनील कानडे, आर. डी. माने, स्वप्नील देसाई, अवधूत सुतार, वैभव बेंद्रे, अभिजित कुंभार, अक्षय कुंभार, साक्षी पाटील, ऋषिकेश कुंभार, आशिष उपलाने, सुमित तडाखे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments