Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात प्रशासनाने कडक पाऊले उचलावीत : जयंत पाटील

सांगली (प्रतिनिधी) :  कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक पाऊले उचलावीत आणि नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील गांव भेटीमध्ये केले. यावेळी त्यांनी टेस्टिंग वाढविणे, विलगीकरण कक्ष सक्षम करण्याच्या सूचनाही केल्या.
 
पालकमंत्री जयंत पाटील यांनी साखराळे, तांबवे, नेर्ले, पेठ, रेठरे धरण, कामेरी,  येडेनिपाणी आदी गावांना भेटी देवून या गावातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, प्रांताधिकारी विजय देशमुख, तहसीलदार रविंद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील या दौऱ्यात सहभागी झाले होते.
 
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, ज्या घरात वेगळी खोली, स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था आहे, तिथे ठीक आहे. मात्र ज्या घरात अशी व्यवस्था नसेल, त्या घरातील रुग्ण विलगीकरण कक्षातच यायला हवेत. ज्या कुटूंबात कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत, त्या कुटुंबातील तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची टेस्ट व्हायला हवी. प्रशासनाने आता कडक धोरण घ्यावे. ग्रामपंचायत व पोलीस खात्याने आरोग्य विभागास सहकार्य करावे. गावातील रुग्णांची संख्या वाढणार नाही याची सर्वांनी मिळून दक्षता घ्या.
     
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, ज्या कुटुंबामध्ये कोरोना रुग्ण आहेत, त्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पुरवठा करण्याची व्यवस्था ग्रामपंचायत व प्रशासनाने उभा करायला हवी. अशी व्यवस्था उभा केल्यास कोरोनाबाधित रुग्ण घरा बाहेर फिरणार नाहीत. गर्दी करणाऱ्या, विनाकारण बाहेर फिरणाऱ्या तसेच मास्क न वापरणाऱ्यावर कडक कारवाई करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी केली.

या दौऱ्यात पं.स. सदस्य आनंदराव पाटील, बाळासाहेब पाटील, देवराज पाटील, संग्राम पाटील, संजय पाटील, दूध संघाचे माजी अध्यक्ष नेताजीराव पाटील, माजी संचालक ब्रम्हानंद पाटील, जि.प सदस्या संगिता पाटील, संचालक आनंदराव पाटील, माजी पं.स.सदस्य संपतराव पाटील, शामराव पाटील, राहुल पाटील, शरद पाटील यांच्यासह या गावचे सरपंच, उपसरपंच, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, गावातील नागरिक सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments