Daily Mahasatta

Daily Mahasatta

काळोख्याच्या परिस्थितीत सुद्धा माणुसकीचा 'स्कोअर' कायम

जतमध्ये उजव्या हाताने केलेले दान डाव्या हातालाही कळू न देणारा.. 'अवलिया'

जत (सोमनिंग कोळी) : स्वतःच्या खिशाला कात्री लावून गरीबाना मदत करणारे असंख्य हात जतमध्ये आहेत. काही अनामिक राहून वैद्यकीय उपचारांसाठी मदतीचे हात पुढे करतात. तर काहीजण रुग्णाच्या नातेवाईकांना अन्नदान करण्याचे कार्य करीत आहेत. रुग्णांना बेडची सोय करून देणे, गरीब रुग्णाची हॉस्पिटलची बिल देणे, आशा प्रकारचे अनेक मदतीची कामे दानशुर व्यक्तीकडून झालेली आहेत. या कामाची सामाजिक कार्यकर्ते सद्दाम अत्तार व भाजपचे शहराध्यक्ष आण्णा भिसे यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा 'साहेब' जाऊदे आमची माहिती पेपरमध्ये छापू नका. आमच्यासोबत असंख्य मित्र आहेत. आम्ही सर्व मिळून हे काम करतो आहोत, असे ते म्हणाले.

प्रसिध्दीपासून लांब असलेल्या व्यक्तींच्या कार्याचा हा वेध, कोरोनामध्ये परिस्थितीच इतकी वाईट होती की,   दुसऱ्या लाटेच्या महामारीत कोणी कोणाला आधार द्यायचा हा प्रश्न निर्माण झाला होता. लॉकडाऊनची परिस्थिती व नातेवाईक,मित्र यांच्या मदतीला जाऊन अनेकांचे गणित कोलमडले होते.कारण रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच होती. मात्र अशा काळोख्याच्या  परिस्थितीतसुद्धा  माणुसकीचा लख्ख प्रकाश  जिवंत असल्याची प्रचिती जत तालुका व शहरवासीयांना अनुभवयास मिळाली.
     
जत शहरातील फळ विक्रेते महिबूब राजेसाहेब मुल्ला यांना  दवाखान्यातील उपचारासाठी मदतीची आवश्यकता होती. भाजपचे तालुकाअध्यक्ष सुनीलभैया पवार व भाजप अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष सद्दामभाई अत्तार यांनी ही मदत सोशल मीडियावर उभी करत मुल्ला यांना मदतीचा ऑक्सिजन देत माणुसकीचा स्कोअर अद्यापही शिल्लक असल्याची प्रचिती दाखवून दिली.
      
अधिक माहिती अशी की,जत शहरातील बसस्थानक समोर फळ विक्री करणाऱ्या  महिबूब राजेसाहेब  मुल्ला या तरुणाला कोरोनाची लागण झाली. उपचारासाठी विजापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणाचे लहानपणीच  वडीलांचे छत्र हरपले. कुटुंब सांभाळन्यासाठी  जत बसस्थानक परिसरात फळे विक्रीचा व्यवसाय सुरू केला.दरम्यान या तरुणाला कोरोनाची लागण झाली.मेहबूब मुल्लाच्या आईने त्याला उपचारासाठी विजापूर येथील बालसींग चौधरी या खाजगी रुग्णालयात दाखल केले.साठवलेले सर्व  पैसे कमवत्या मुलाला वाचवण्यासाठी त्या मातेने खर्च केले. प्रसंगी कर्जही काढले. 
      
मात्र उपचारासाठी खर्च जास्त असल्याने ती माता हतबल झाली .ही अडचण भाजप अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष सदामभाई  अत्तार व भाजप तालुकाध्यक्ष सुनीलभैय्या पवार यांना समजली . त्यांनी  सोशल मिडियावर मदतीचे आवाहन केले. त्यानंतर अनेक दानशूर नागरिकांनी मदत केली. रक्कम दिलेल्या मदतीचा स्क्रिनशॉट काढून तो सोशल मीडियावर टाकल्याने इतरांकडूनही मदतीचा ओघ सुरूच झाला. यातून सुमारे ७२ हजार रुपये जमा झाले. तर समाजातील दानशूर व्यक्तीकडून ६० हजार रुपये जमा झाले. यासाठी सलीम नदाफ, शफीक इनामदार, मकसूद नगारजी, रज्जाक नगारजी आदींनी परिश्रम घेतले.
       
भाजपच्या या दोन जागरूक तरुणांमुळे मुल्ला या  तरुणाचे प्राण वाचले आहेत. वास्तविक भाजप तालुकाध्यक्ष सुनीलभैय्या पवार व त्यांचे कुटुंबीय नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले आणि माणुकीच्या भावनेतून भरघोस मदत जमा झाली. भाजपचे तालुकाअध्यक्ष सुनील पवार व  अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष सद्दामभाई अत्तार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments