Daily Mahasatta

Daily Mahasatta

कृष्णेचे 'ते' ८२० सभासद मतदानास पात्र; सत्ताधारी भोसले गटाला झटका

कडेगाव (सचिन मोहिते) : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदानास पात्र ठरलेल्या ८२० सभासदांना पुन्हा अपात्र करण्यासाठी सत्ताधारी भोसले गटाने कृष्णा कारखान्याच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवार दि. २५जून रोजी फेटाळून लावली आहे, यामुळे अविनाश मोहिते यांनी सभासदांचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवणे करता दिलेला लढा न्यायालयात यशस्वी ठरला असून या निवडणुकीत वादग्रस्त ठरलेले ८२० सभासद मतदानास पात्र ठरल्यामुळे सत्ताधारी भोसले गटाला फार मोठा धक्का बसला आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात संस्थापक पॅनेलच्यावतीने ८२० सभासदांचे कामकाज पाहणारे ॲड. प्रभंजन गुजर यांनी दिलेली माहिती अशी की,
      
य. मो. कृष्णा कारखान्याने मतदानास अपात्र ठरवलेल्या ८२० सभासदांना  पात्र ठरवण्यात आले होते. याबाबत सत्ताधारी भोसले गटाने कृष्णा कारखान्याच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, या सुनावणीसाठी अंतिम तारीख २५ जुन नेमली होती. आज झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने सत्ताधारी भोसले गटाने ८२० सभासदांना अपात्र करणेकामी दाखल केलेली याचिका फेटाळून लावून सर्वांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार अबाधित ठेवला असल्याचे सांगितले. सदरील सर्व सभासद या निवडणुकीत मतदानास पात्र राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
         
सन १९९९च्या निवडणुकीत १३ हजार ५२८ सभासदांच्या अपात्रतेबाबतचा मुद्दा न्यायालयीन लढाईत भोसले यांच्या बाजूने गेला होता, तसेच २०१५च्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर संस्थापक पॅनल ने केलेली याचिका अद्याप प्रलंबित आहे, ८२०सभासदांच्या अपात्र बाबत भोसले यांनी गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन हेलपाटे सुरू ठेवले होते मात्र अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली अपात्र सभासदांची बाजू मांडली गेली असल्यामुळे पहिल्यांदाच भोसले यांना न्यायालयीन लढाईत पराभवास सामोरे जावे लागले आहे. ८२० मते निर्णायक ठरण्याची शक्यता असून याचा मोठा फटका भोसले गटाला  बसला आहे.

पात्र ठरलेल्या सभासदांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात सीनियर कौन्सिल वाय. एस. जहागीरदार यांनी कामकाज पाहिले त्यांना ॲड सुरेल शाह व ॲड प्रभांजन गुजर यांनी सहकार्य केले. सरकार पक्षाच्या वतीने माजी महाधिवक्ता विजयसिंह थोरात यांनी कामकाज पाहिले.
------------------------------
आता जनतेच्या न्यायालयात 
पराभूत करणार ...
पैशाच्या जोरावर सभासदांच्या मतदानाचा हक्क डावलू पाहणाऱ्या सत्ताधारी भोसले गटास न्यायालयाने खुप मोठी चपराक लगावली असून आजपर्यंत पहिल्यांदाच त्यांचा न्यायालयीन लढाईत पराभव झाला आहे. आता २९ तारखेस नारळ या चिन्हावर शिक्का मारून सभासद त्यांना जनतेच्या न्यायालयात पराभूत करणार आहेत.
- अविनाश मोहिते

Post a Comment

0 Comments