Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरात व्हावे : आमदार अनिल बाबर यांची मागणी

मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन देताना आमदार अनिल बाबर.

विटा (प्रतिनिधी)
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र बस्तवडे (ता. तासगाव) येथे करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला असलचे समजते. सदरची जागा ही विद्यापीठाच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरातच व्हावे, अशी मागणी आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

आमदार बाबर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे,
माझे मतदारसंघातील खानापूर जि. सांगली हे शहर खानापूर, आटपाडी, जत व तासगांव तालुक्यांचे मध्यभागी आहे. तसेच खानापूर शहरातून राष्ट्रीय महामार्ग जात असुन या शहराशेजारी शासनाची जमीन सपाट असुन मुबलक पाण्याची ही उपलब्धता आहे. पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कोल्हापूर, सातारा येथे जावे लागत असलेने ग्रामीण व दूर्गम भागातील मुख्यत्वे अवर्षणप्रवण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या गैरसोयीचे होत आहे.

शिवाजी विद्यापीठाचे मॅनेजिंग कौंन्सिलने खानापूर येथे उपकेंद्र होणेबाबतचा ठराव करुन सदरचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. परंतू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र बस्तवडे ता. तासगाव येथे करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला असल्याचे समजते. सदरची जागा विद्यापीठासाठी अयोग्य असलेचे समजते. त्यामुळे खानापूर परिसरातील नागरिकांमधून असंतोष निर्माण झालेला आहे. माझी विनंती आहे की, याबाबतची सर्व कागदपत्राचे पुन्हा अवलोकन करून सदर निर्णयाचा फेरविचार होऊन शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर जि. सांगली येथे करण्याचा विचार करावा, अशी मागणी आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments