Daily Mahasatta

Daily Mahasatta

मंडल अधिकारी किरण भिंगारदेवे लाचलुचपतच्या जाळ्यात

पलूस (प्रतिनिधी) : जमीन खरेदीची नोंद करुन देण्यासाठी ८ हजारांची लाच घेताना पलूस येथील मंडल अधिकारी किरण नामदेव भिंगारदेवे (मुळ रा. विटा ,ता. खानापूर) याला अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (सोमवार) ही कारवाई केली. भिंगारदेवे याच्यासोबत वसंत रामचंद्र गावडे या खासगी इसमालाही अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार यांनी आपल्या पत्नीच्या नावे जमीन खरेदी केली आहे. मात्र या खरेदीची नोंद होऊ नये, अशी तक्रार एकाने मंडल अधिकारी भिंगारदेवे यांच्याकडे केली होती. त्याची सुनावणी भिंगारदेवे यांच्यासमोर सुरू होती. याप्रकरणी आलेला तक्रार अर्ज निकालात काढून सातबारावर जमिनीची नोंद करून देण्यासाठी भिंगारदेवे यांनी खासगी इसम गावडे याच्यामार्फत दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.

याप्रकरणी तक्रारदार यांनी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच दिवशी लाचलुचपत विभागाने सापळा रचून पडताळणी केली होती. त्यामध्ये मंडल अधिकारी भिंगारदेवे याने खासगी इसम गावडे याच्या माध्यमातून दहा हजार लाच मागितल्याचे व चर्चेअंती आठ हजारावर व्यवहार निश्चित केल्याचे निष्पन्न झाले. 

गेल्या तीन महिन्यापासून लाचलुचपत विभागाच्यावतीने सापळा लावला जात होता. अखेर आज सोमवारी मंडल अधिकारी किरण भिंगारदेवे (मुळ रा. विटा) आणि एजंट गावडे याला रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, बाळासाहेब पवार, सीमा माने, संजय सपकाळ, अविनाश सागर, अजित पाटील, रवींद्र धुमाळ, भास्कर मोरे, संजय कलकुटगी यांनी केली.

Post a Comment

0 Comments