Daily Mahasatta

Daily Mahasatta

पत्रकारांना लसीकरणात प्राधान्य द्यावे : आ. सुधीर गाडगीळ

सांगली, (प्रतिनिधी):  सांगली जिल्ह्यातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील सर्व पत्रकार व कॅमेरामन याना तात्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून त्यांना लस देण्यास प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आले आहे. 

या निवेदनात सर्व वृत्तपत्रे, पत्रकार, विविध प्रसिद्धी माध्यमातील पत्रकार, कॅमेरामन रस्त्यावर येऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून वृत्तांकन करीत असतात. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. कोरोनाच्या काळात पत्रकारबंधू समोर येऊन कार्य करीत असताना अनेक पत्रकार कोरोनाबाधित झाले आहेत. काहींना आपला प्राण गमवावा लागला आहे. देशातील सुमारे १२ राज्यात प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्यात आले आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रात हा निर्णय प्रलंबित आहे. 

राज्यातील पत्रकारांच्या विविध संघटना याबाबत मागणी करीत आहेत. काही दिवसापूर्वी पत्रकारांनी ऑनलाईन माध्यमातून सांकेतिक आंदोलन केले होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो आहोत. दुसऱ्या लाटेत कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या अधिक आहे. अशातच त्यांच्या जीवाची व सुरक्षेची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित केल्यास लसीकरणात प्राधान्य मिळेल.

या कोरोनाच्या काळात रुग्णालयात, स्मशानभूमीत जाऊन जनसामान्यांच्या व्यथा मांडण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधून हे पत्रकार काम करत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागरण करण्यातही पत्रकारांचा मोठा वाटा आहे. कोरोनाने संक्रमित झालेल्या पत्रकारांची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या काळात ज्याप्रमाणे राज्यसरकारच्या कित्येक विभागांना वर्क फ्रॉम होम करता येत नाही तशीच अवस्था पत्रकारांची आहे. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला घटनास्थळावर जाऊनच काम करावे लागते. त्यामुळे त्यांना या संकटाचा सामना करीतच काम करावे लागते. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या पत्रकार व कॅमेरामन याना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करावे व आपण जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश द्यावेत असे म्हटले आहे. यावेळी अतुल माने, मकरंद म्हामूलकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments