Daily Mahasatta

Daily Mahasatta

दहावी पास झालात, पुढील प्रवेशाचे काय?

विटा (प्रतिनिधी) : यावर्षी सुमारे अकरा लाख विद्यार्थी दहावी पास होणार आहेत. परंतु इयत्ता अकरावी साठी राज्यातील प्रवेश क्षमता आठ लाखाच्या आसपास आहे. अगोदरच काही शहरांमध्ये आवडत्या शाखांसाठी प्रवेशास एक - एक टक्के साठी युद्ध सुरू असते मग या वर्षी प्रवेश प्रक्रिया कशी होणार ? दहावी मधील मूल्यमापन पद्धतीचा परिणाम काही हुशार विद्यार्थ्यांचे प्रवेशावर होणार का ? त्यातून विद्यार्थी मानसिकतेचा प्रश्न नक्कीच निर्माण होऊन प्रवेश प्रक्रियेत गोंधळ माजण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत आदर्श माध्यमिक विद्यामंदिर विटाचे मुख्याध्यापक मा. सुभाष धनवडे यांनी व्यक्त केले आहे. 

मुख्याध्यापक सुभाष धनवडे म्हणाले, देशाबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यात गेल्या वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे जनतेच्या दैनंदिन जीवनासह अनेक क्षेत्रात भयंकर आर्थिक नुकसान झाले असून या कोरोना महामारीचे शिक्षणक्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार आहेत.

गतवर्षीच्या परीक्षा व चालू शैक्षणिक वर्ष
22 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रात पहिले लॉकडाऊन झाले व तेव्हापासून सर्व शाळा व महाविद्यालय बंद केली गेली ,इयत्ता दहावी व इयत्ता बारावी च्या बोर्ड परीक्षा कशातरी संपल्या व लॉकडाउनच्या निर्बंधात विद्यार्थ्यांचे निकाल तयार करताना दरवर्षीपेक्षा यावर्षी सढळ हाताने गुणांची खैरात करण्यात आली, त्यानंतर इयत्ता पहिली ते अकरावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी परीक्षेशिवाय पुढच्या वर्गात सरसकट पास करण्यात आले, म्हणजेच गेल्या वर्षीचे विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन योग्य पद्धतीने झाले असे म्हणणे चुकीचे ठरेल.

ऑनलाइन शिक्षण 
त्यानंतर या वर्षीच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाइन शिक्षणाने झाली त्यासाठी पालक ,शिक्षक व शासन यांनी चांगलीच कंबर कसली. अगोदर कोरोना व त्यामुळे आर्थिक संकट ,मग शिक्षकांचा आग्रह व विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे पालकांना अँड्रॉइड मोबाईल घ्यावे लागले आणि ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. इयत्ता चौथी पर्यंतचे शिक्षण वर्षभर असेच चालू राहिले आणि शेवटी परीक्षेशिवाय सर्व विद्यार्थी वरच्या वर्गात गेले. राज्यातील पुणे-मुंबई आणि काही मोठ्या शहरांचा भाग वगळता इयत्ता पाचवी ते आठवी चे वर्ग प्रत्यक्षात 27 जानेवारी 2021 पासून तर इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरू करण्यात आले तेही 50 टक्के उपस्थिती धरून विद्यार्थ्यांना एक दिवस आड शाळेत बोलावलं जाऊ लागलं. शाळेमध्ये चार तासांची शाळा सुरू झाली. त्यातही विज्ञान, इंग्रजी, गणित या विषयांना प्राधान्य देऊन प्रत्यक्ष वर्ग भरू लागले. मग शाळा उशिरा सुरू झाल्या म्हणून प्रत्येक विषयाचा किमान 25 टक्के अभ्यासक्रम यावर्षी साठी वगळण्याचा निर्णय झाला. उर्वरित अभ्यासक्रम शिक्षकांनी काही ठिकाणी ऑनलाइन शिक्षणाद्वारे व काही ठिकाणी प्रत्यक्ष वर्गात शिकवून पूर्ण करण्यात आला.

इयत्ता पहिली ते नववी व अकरावी परीक्षांचा निर्णय
मार्च 2021 नंतर महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे पाहून राज्य शासनाने 3 एप्रिल 2021रोजी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या व शंभर टक्के विद्यार्थी सरसकट पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना आरटीई 2009 चा आधार घेत प्रत्येक विद्यार्थी वरच्या वर्गात पाठवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याच वेळी इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील व त्यासाठीची सर्व तयारी झाली आहे असे शासनाकडून पुन्हा पुन्हा सांगितले जात होते. शेवटी 12 एप्रिल 2021 ला परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षण मंत्री मा. वर्षा गायकवाड यांनी केली. त्यानुसार मे च्या शेवटी इयत्ता बारावी व जूनमध्ये इयत्ता दहावी या वर्गाच्या परीक्षा घेण्याचे सूतोवाच शासनाच्या वतीने करण्यात आले. दरम्यान आठ एप्रिल 2021 रोजी इयत्ता नववी व इयत्ता अकरावी या वर्गांच्या परीक्षा रद्द करून सरसकट सर्वच विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे पुढील वर्गात घेण्याचा निर्णय झाला.

अखेर इयत्ता दहावी परीक्षा रद्द
इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा होणारच असे ठाम मत शासनाने मांडले असतानाच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय प्रथम घेण्यात आला, दरम्यान सीबीएससी व आयसीएसी या बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्याने राज्य परीक्षा मंडळ चांगलेच पेचात सापडले आणि अखेर वीस एप्रिल 21 रोजी राज्य शासनाने इयत्ता दहावी परीक्षा रद्द करून सर्वांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. खरं तर शासनाने आठ दिवसात परीक्षा घेण्याचा निर्णय बदलला यामध्ये पालक, विद्यार्थी, शिक्षक संघटना व शिक्षणतज्ञ यांचा विचार घेणे आवश्यक होते परंतु तसे काही घडले नाही .परीक्षा होणारच या भीष्मप्रतिज्ञा मुळे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेची मानसिकता झाली होती, आता हुशार विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परीक्षा रद्दचा परिणाम होऊ शकतो .केवळ सीबीएसई व आयसीएसई या बोर्डाच्या निर्णयामुळे राज्य मंडळाने घेतलेला परीक्षा घेण्याचा प्रागतिक निर्णय बदलला. सी बी एस सी, आय सी एस सी बोर्डाकडे इयत्ता नववी व इयत्ता दहावी साठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती प्रचलित आहे त्यामुळे त्यांच्या मूल्यांकनात वस्तुनिष्ठता आहे परंतु राज्य मंडळाचे काय? अगदी ग्रामीण भागातील एसएससी बोर्डाचे जाळे आहे मग त्यांचे मूल्यमापन कसे होणार ?जवळपास पंधरा लाख विद्यार्थी इयत्ता दहावी उत्तीर्ण होणार आहेत त्यांच्यासाठी कोणती मूल्यमापन पद्धती राज्य परीक्षा मंडळ वापरणार आणि त्याचा हुशार व इतर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर काय परिणाम होणार हे येणारा काळच ठरवणार आहे.

इयत्ता दहावी पास आता पुढील प्रवेशाचे काय?
यावर्षी सुमारे अकरा लाख विद्यार्थी दहावी पास होणार आहेत. परंतु इयत्ता अकरावी साठी राज्यातील प्रवेश क्षमता आठ लाखाच्या आसपास आहे. अगोदरच काही शहरांमध्ये आवडत्या शाखांसाठी प्रवेशास एकेक टक्के साठी युद्ध सुरू असते मग या वर्षी प्रवेश प्रक्रिया कशी होणार ? दहावी मधील मूल्यमापन पद्धतीचा परिणाम काही हुशार विद्यार्थ्यांचे प्रवेशावर होणार का? त्यातून विद्यार्थी मानसिकतेचा प्रश्न नक्कीच निर्माण होऊन प्रवेश प्रक्रियेत गोंधळ माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे कृषी पदविका अभ्यासक्रम, तंत्र निकेतन पदविका अभ्यासक्रम, आयटीआय यासारख्या व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रमासाठी कशाप्रकारे प्रवेश प्रक्रिया राबवणार आणि त्यातून इयत्ता नववी व इयत्ता दहावी या दोन वर्षात परीक्षेशिवाय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी कसे व कोणते कौशल्य प्राप्त करणार हा मुद्दा संशोधनाचाच आहे.

या सर्वासाठी खरतर राज्य परीक्षा मंडळाच्या दहावी परीक्षा पुढे ढकलून परीक्षा घेण्याचा निर्णय प्रागतिक व योग्य होता असे वाटते, नाहीतर बारावी परीक्षा होणारच आहेत त्याच धर्तीवर दहावी परीक्षा घेता आल्या असत्या किंबहुना तशी बोर्डाची तयारी सुद्धा झाली होती. प्रत्येक शाळेत उपकेंद्र स्थापन करून केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक यांच्या नेमणुका झाल्या होत्या. शाळेतील खोल्या व इतर सर्व स्टाफ वापरून जून किंवा जुलै मध्ये या परीक्षा घेतल्या असत्या तर नक्कीच हा राज्य परीक्षा मंडळाचा निर्णय समाधानकारक व योग्य झाला असता असे वाटते .

इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या गेल्या दोन वर्षातील शिक्षणाची ही अवस्था आहे, त्याचप्रमाणे उच्च शिक्षणातही काही वेगळी नाही, गतवर्षी फक्त अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा झाल्या व त्यानुसार विद्यार्थी पदवीधर झाले. अगदी व्यावसायिक शिक्षणातही ऑनलाईन परीक्षेतून भरमसाठ टक्केवारी सह पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी आपले करियर अजमावत आहेत त्यांना कितपत यश मिळणार हे येणारा काळच ठरवणार आहे .

एकूणच काय या कोरोना महामारी मुळे सामान्य लोकांचे जीवन उध्वस्त झालेच आहे. परंतु शिक्षणक्षेत्रात झालेले हे नुकसान अनेक पिढ्या पाठीमागे जाणारे असेल हे नक्की.

- श्री. सुभाष धनवडे, मुख्याध्यापक
आदर्श माध्यमिक विद्यामंदिर विटा
ता. खानापूर, जि. सांगली.

Post a Comment

0 Comments