Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूरातील डॉ. सांगरुळकर यांचे कोविड हॉस्पिटल बंद करावे : सर्व पक्षीय मागणी

इस्लामपूर (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉकटर सचिन सांगरुळकर यांचे लक्ष्मी- नारायण कोविड हॉस्पिटल बंद करावे अश्या मागणीचे सर्व पक्षीय निवेदन आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साळुंखे यांना देण्यात आले आहे. 

या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील डॉ. सचिन सांगरुळकर यांचे पेठ सांगली रोड वर लक्ष्मी-नारायण हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना चांगली सेवा दिली जात नाही. रुग्णांचे हाल होत आहेत . डॉ. सांगरूळकर व त्यांची पत्नी नैनीशा यांच्या चुकीच्या व भोंगळ वागण्याने वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासला आहे. 

हे कोविड सेंटर तात्काळ बंद करावे, अन्यथा सेंटरच्या बाहेर आंदोलन करावे लागेल, असा इशारा सर्व पक्षीय नेत्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुखे यांच्याकडे निवेदनाव्दारे दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून हे हॉस्पिटल व कोविड सेंटर चर्चेत आले आहे. रुग्णाला दाखल करून घेताना अनामत रक्कमेची मागणी करणे, डिस्चार्ज रुग्णांचे बील तीन ते चार लाख रुपये इतके भरमसाट करणे, दाखल रुग्ण व मृत्यू झालेल्या रुग्णांची शासनाला चुकीची माहिती पुरवणे, यासारख्या गंभीर चुका डॉक्टरांकडून होत आहेत.

सदरचे कोविड सेंटर माणसांना जगवण्यासाठी आहे की, मारण्यासाठी असा सवाल निर्माण झाला आहे . त्यामुळे हे कोविड सेंटर तात्काळ बंद करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे शाकीर तांबोळी, मनसेचे शहराध्यक्ष सनी खराडे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष मकरंद करळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राम कचरे, युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस विजय पवार यांनी सहया केलेल्या आहेत.

Post a Comment

0 Comments