Daily Mahasatta

Daily Mahasatta

राज्यातील यंत्रमागधारकांचे पाच हजार कोटीचे नुकसान : किरण तारळेकर

सांगली (प्रतिनिधी) : पहिल्या टप्प्यातील २१ दिवसांच्या लाॅकडाऊनमुळे यंत्रमाग विभागाचे सरासरी उत्पादन क्षमता विचारात घेता सुमारे १७० कोटी मीटर्स कापड उत्पादन होऊ शकले नाही. त्याची किंमत पांच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. अर्थातच राज्यातील यंत्रमागधारकांचे सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष आणि यंत्रमाग व्यवसायाचे अभ्यासक किरण तारळेकर यांनी दिली आहे. 

याबाबत माहिती देताना किरण तारळेकर म्हणाले, गेल्या वर्षभरापासुन कोरोना व्हायरसच्या भयानक व जिवघेण्या संक्रमणामुळे जवळपास संपुर्ण जगच ठप्प झाले आहे. गेल्या वर्षीच्या लाॅकडाऊनमधुन जनजीवन सावरत असतानाच मार्च २१ पासुन पुन्हा दुसऱ्या लाटेने हाहाःकार माजवीला आहे. या भयानक जिवघेण्या आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्रात सुरुवातीला १ एप्रिल २१ पासुन निर्बंध व १५ एप्रिल २१ पासुन संपुर्ण लाॅकडाऊन लावण्यात आला. तो आता १५ मे पर्यंत वाढविला आहे.

या लाॅकडाऊनमध्ये उद्योगक्षेत्रातील जिवनावश्यक वस्तु, औषधे व अनुशांगीक उत्पादने वगळता इतर सर्व उद्योग बंद करावे लागले आहेत. ज्या कारखान्यात कामगारांची रहाण्याची व्यवस्था आहे, त्यांना उद्योग चालु ठेवण्यास परवानगी मिळाली. परंतु राज्यातील विटा, मालेगांव, भिवंडी, इचलकरंजी, सांगली या यंत्रमागकेंद्रावरच्या १० लाख यंत्रमागांचा विचार करता कामगारांच्या निवासाची सोय १०/१५ टक्के कारखान्यांकडे सुद्धा नसल्याने ८०/९० टक्के यंत्रमाग बंद आहेत. या बंदला आज तब्बल २१ दिवस झाले आहेत व संक्रमणाची वाढती संख्या पाहता हा लाॅकडाऊन अजुन किती दिवस राहील हे सांगता येत नाही. यामुळे देशभरातील सर्वात मोठा रोजगार पुरवणारी व प्रचंड मोठी आर्थिक उलाढालींची क्षमता असलेली कापुस, जिनिंग, स्पिनिंग, विव्हिंग, प्रोसेसिंग, गारमेंटिंग हि सर्व वस्त्रोद्योग साखळी पुन्हा एकदा ठप्प झाली आहे.

आज आपण यापैकी आपल्या राज्यातील केवळ विव्हिंग अर्थात विकेंद्रित यंत्रमाग विभागावर याचे पहिल्या २१ दिवसांत किती व कसे परिणाम झालेत याचा विचार करणार आहोत. देशात विकेंद्रीत विभागामध्ये वीस लाख यंत्रमाग असुन त्यापैकी पन्नास टक्के अर्थात दहा लाखापेक्षा जास्त यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. पहिल्या टप्प्यातील २१ दिवसांच्या लाॅकडाऊनमुळे यंत्रमाग विभागाचे सरासरी उत्पादनक्षमता विचारात घेता सुमारे १७० कोटी मीटर्स कापड उत्पादन होऊ शकले नाही. त्याची किंमत पांच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होते अर्थात पाच हजार कोटी रुपयांचे कापड उत्पादन बुडाले आहे. 

विकेंद्रित विभागातून केवळ यंत्रमागावर तीन लाख प्रत्यक्ष व एक लाख अप्रत्यक्ष कामगारांचा रोजगार अवलंबुन असुन या २१ दिवसांत त्यांचा सुमारे ३२५ कोटी रुपयाचा रोजगार बुडाला आहे. पांच हजार कोटी रुपये किंमतीचे कापड उत्पादन बुडाले असल्याने केंद्र व राज्य शासनास पांच टक्के दराने मिळणाऱ्या २५० कोटी रुपयांच्या जीएसटी महसुलावर शासनाला थेट पाणी सोडावे लागत आहे. तर महावीतरण ला या २१ दिवसातला यंत्रमाग वीज वापरापोटीच्या पन्नास कोटी युनिट म्हणजेच सुमारे १५० कोटी रुपयांच्या वीज विक्री वर पाणी सोडावे लागत आहे.

अशा प्रकारे केवळ आपल्या राज्यातील वस्त्रोद्योग साखळीपैकी फक्त यंत्रमाग विभागाच्या पहिल्या २१ दिवसांच्या नुकसानीची आकडेवारी एवढी प्रचंड व भयावह आहे. संपुर्ण वस्त्रोद्योग साखळीचा एकत्रीत विचार केला तर हे नुकसान प्रचंड असणार आहे. शिवाय दुर्दैवाने लाॅकडाऊन कालावधी जेवढा वाढेल त्या प्रमाणात हे नुकसान आणखी वाढतच जाणार आहे. लाॅकडाऊन कधी संपेल हे सांगता येत नाही आणि त्यानंतर उत्पादन पुर्वपदावर येणे व थांबलेले अर्थचक्र पुन्हा रुळांवर येणे कमालीचे जिकीरीचे व अडचणीचे होणार आहे.

दुसऱ्या बाजुला या बंदमुळे सुत व कापड दरात झालेल्या घटीमुळे यंत्रमागधारकांकडील सुत व कापडामधील दरघसरणीचा करोडो रुपयाचा थेट फटका बसणार आहे. हि फार मोठी चिंतेची बाब झाली आहे. तरीही देशावरच्या या भयानक संकटामध्ये राज्यातील सर्व यंत्रमाग लघुउद्योजकांनी शासनास व प्रशासनास सहकार्य करायची भुमिका घेतली आहे. या भयावह संकटातून बाहेर आल्यानंतर मात्र अगोदरच अडचणीतुन चाललेल्या या लघुउद्योगासाठी विशेष सहाय्य योजना जाहिर केली तरच हा उद्योग पुर्वपदावर येईल, असे मत किरण तारळेकर यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments