Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळ्यात बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याप्रकरणी एक जण ताब्यात

शिराळा (विनायक गायकवाड) : येथील बिऊर फाट्याजवळ ऊस शेती कार्यालयासमोर बेकायदेशीर विनापरवाना शस्त्रे बाळगल्याप्रकरणी नाटोली येथील युवकास मुद्देमालासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुद्देमालासह अटक करून ताब्यात घेतले.

याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शिराळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिराळा - चिखली रोडवर बायपास रस्ता ते बिऊर फाटा दरम्यान असणाऱ्या ऊस शेती विभागीय कार्यालय जवळील वडापावच्या गाड्याशेजारी नाटोली ता. शिराळा येथील रोहन प्रताप नाकील वय २२ हा युवक पांढऱ्या पोत्यामध्ये धारदार शस्त्र घेऊन थांबला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार सुनील चौधरी यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत मिळाली. मिळालेल्या बातमीनुसार दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा मारून सदर युवकास ताब्यात घेतले.

त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याच्या जवळील पांढऱ्या पोत्यामध्ये एक धारदार तलवार आढळून आली. अधिक माहिती विचारली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घरांमध्ये अजून तीन तलवारी लपवून ठेवल्या असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी रोहन नाकील या युवकाच्या नाटोली येथील घराची तपासणी केली. या तपासणी मध्ये त्याने सांगितल्याप्रमाणे तीन तलवारी मिळून आल्या. या चारही तलवारींची किंमत जवळपास ३ हजार रूपये पर्यंत आहे. या चारही तलवारी गावठी बनावटीच्या असून धारदार व टोकदार आहेत.

हि कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, मारुती साळुंखे, सुनील चौधरी, गजानन घस्ते, कुबेर खोत, मुड्डतसर पाथरवट, सोहील कार्तीयानी, अरुण सोकटे यांनी पार पाडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेऊन शिराळा पोलिसांकडे सदर गुन्हा वर्ग करून आरोपीस ताब्यात दिले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल दिपक हांडे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments