Daily Mahasatta

Daily Mahasatta

पुरपट्टयातील मालमत्ताधारकांना स्थलांतराच्या नोटीसा बजावणार : सांगली महापालिकेच्या बैठकीत निर्णय

सांगली (प्रतिनिधी) : संभाव्य पूरस्थिती लक्षात घेत महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी पूरभागातील नगरसेवकांची तातडीची बैठक घेत संभाव्य पूरस्थितीबाबत सर्वांकडून सूचना जाणून घेतल्या. यावेळी पूरपट्ट्यातील पुरामुळे बाधित होणाऱ्या मालमत्ता धारकांना स्वतःहून स्थलांतर करण्याच्या नोटिसा बजावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला तसेच पूर भागात वीज, पिण्याचे पाणी ,औषधे तसेच मदतीसाठी साधन सामुग्री उपलब्ध करण्याची सूचना सर्वच नगरसेवकांनी या बैठकीत केली. 

संभाव्य पुरस्थितीबाबात मंगल धाम येथे ही बैठक घेण्यात आली. बैठकीस महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, उपायुक्त राहुल रोकडे आदींसह पूर भागातील नगरसेवक उपस्थित होते. यावेळी नगरसेवकांच्या सूचना महापौर सुर्यवंशी आणि आयुक्त कापडणीस यांनी जाणून घेतल्या. यामध्ये संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वीच पुरबधित भागातील नागरिकांनी पाणी वाढण्या अगोदर सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याबाबत नोटीस बजावण्याचा तसेच मनपाकडून कोणतीही नुकसान भरपाई दिली जाणार नाही अशी नोटीस तात्काळ बजावण्याची सूचना सर्वच नगरसेवकांनी यावेळी केली. 

याचबरोबर पुर काळात आवश्यक औषधे, साथीचे आजार उद्भवल्यास त्याबाबत लागणारी औषधे आताच उपलब्ध करण्याची सूचनाही केली. याचबरोबर पाणीपुरवठा करणारे पंप पाण्याखाली जातात त्यामुळे शहरात असणारे बोअरिंगमध्ये विद्युत मोटार बसवून तात्पुरता पाणी पुरवठा करता येईल अशीही सूचना मांडण्यात आली. 

या बैठकीस नगरसेवक धीरज सुर्यवंशी, अजिंक्य पाटील, सुबराव मद्रासी, संजय यमगर, फिरोज पठाण, मंगेश चव्हाण, प्रकाश मुळके, नसीमा नाईक, वर्षा निंबाळकर, अपर्णा कदम यांच्यासह प्रभाग समितीचे सहायक आयुक्त व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments