Daily Mahasatta

Daily Mahasatta

जयंतराव कोरोनाग्रस्तांच्या जीवाशी खेळू नका : निशिकांत पाटील

इस्लामपूर (सूर्यकांत शिंदे) : सांगली जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे, मात्र सत्तेत असणारे जयंत पाटील हे जिल्ह्याचे पालक मंत्री असूनसुद्धा कोरोना चा विषय गांभीर्याने घेत नाहीत. प्रकाश हॉस्पिटलमध्ये ६५० बेडची एकाच छत्राखाली सुविधा असतानाही प्रशासनावर दबाव आणून ती मिळू देत नाहीत. पालकमंत्री कोरोना महामारीच्या काळातही खुनशी राजकारण करण्यात व्यस्त आहेत हे दुर्दैवी आहे. आत्तापर्यंतचे ते निष्क्रिय पालक मंत्री असल्याचा घणाघाती आरोप नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केला. प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

निशिकांत पाटील म्हणाले, " कोरोनाने लोकांचे कोल्ह्या-कुत्र्या सारखे जीव जात आहेत. मात्र स्वतःला पालक मंत्री म्हणवणारे जयंत पाटील रुग्णांना सुविधा देण्याचे सोडून या कोरोनाच्या कठीण काळातही काना डोळा करत कुटील राजकारण करत आहेत. आपण पालक मंत्री अहात, जबाबदारीने वागा. 

ते म्हणाले, " सात वेळा आपण आमदार, मंत्री असूनसुद्धा कोरोना काळात मतदार संघासाठी काय केले ? फक्त शनिवार रविवारी पाहुण्यांसारखे येऊन निघून जाता, जिल्ह्यात तळ ठोकून रुग्णांचे जीव वाचवा, लसीकरणाची व्यवस्था करा. प्रकाश हॉस्पिटलमध्ये ६५० बेड ची सुविधा असताना यामध्ये कुटील राजकारण आणून ही सुविधा प्रकाश हॉस्पिटलला मिळू देत नाहीत, त्यामुळे अनेक गरीब गरजू लोकांना सुविधा मिळत नाहीत आणि काहींना प्राणही गमवावे लागत आहेत याची आम्हाला खंत आहे. 

कृपया अशा कठीण परिस्थितीत राजकारण आणू नका व सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळू नका. वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा फक्त १७५ बेडचीच परवानगी मिळाली आहे. जिल्ह्यात जेवढे व्हेंटिलेटर आले आहेत त्यातील एकही प्रकाश हॉस्पिटलला मिळू दिला नाही. ६५० ऑक्सिजन बेडस ची क्षमता असताना, ५७२ जम्बो सिलेंडर, ६ kl. ऑक्सिजन टॅंक, कोविडच्या सर्व चाचण्या करण्याची क्षमता असताना परवानगी दिली जात नाही. 

परवानगीपेक्षा जास्त असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज द्या असे शासनाकडून सांगितले जाते. हा कुठला न्याय आहे ? जयंत पाटील यांनी त्यांची सोय करावी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कारखानदारांना कोविड सेंटर उभारण्याचे आदेश देऊनही जयंत पाटील यांनी काय केले नाही. स्वमालकीचे चार कारखाने असताना ते एका बेडची व्यवस्था करू शकले नाहीत . पालकमंत्री म्हणून त्यांनी प्रकाश हॉस्पिटलला भेट द्यावी, त्यांनतर त्यांनी निर्णय घेतल्यावर आमची तक्रार असणार नाही, अशी कळकळीची विनंती आहे. २४ तास केवळ राजकारण डोक्यात ठेऊन राहणारा मंत्री पहिल्यांदाच पाहतो आहे.

जिल्ह्यात हॉस्पिटलची संख्या मोठी आहे, सर्व रुग्णांची सोय होऊ शकते त्यासाठी योग्य नियोजन व्हायला हवे. जयंत पाटील यांनी जनतेच्या आरोग्याची, हिताची काळजी घ्यावी, त्यांच्याकडून जिल्ह्यातील रुग्णांना न्याय मिळाला नाही तर आम्ही राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्याकडे न्याय मागू, तिथेही न्याय मिळालाच नाही तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागू. भाजपने मदतीची भूमिका घेतली आहे, आम्हाला सांगाल ती मदत करायला आम्ही तयार आहोत."

-----------------------
जयंत पाटील यांना ३ वेळा फोन केले...
ही वेळ सर्व विसरून कोरोनाच्या विरोधात लढण्याची आहे, राजकारण करण्याची नाही. राग, राजकारण बाजूला ठेऊन मी स्वतः जयंत पाटील यांना ३ वेळा फोन लावला. मेसेज केले मात्र त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही असेही निशिकांत पाटील म्हणाले.

Post a Comment

0 Comments