Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी : आ. गाडगीळ

सांगली ता. २१ (प्रतिनिधी) : जिल्हातील छोटे-मोठे सर्व व्यापारी वर्गाला व्यवसाय करणेसाठी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी मिळावी अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. 

आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेऊन सर्व समावेशक व्यापारीवर्गासह मागणीचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. महापालिका क्षेत्रातही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन सुरू आहे. गेले पंधरा दिवस महापालिका क्षेत्रात शासनाच्या सूचनेनुसार कडक निर्बंध घालून लॉकडाऊनही पाळण्यात आला. या काळात शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. मात्र यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. सांगलीच्या व्यापाऱ्यांना तसेच विक्रेत्यांनाही गेली दोन वर्षे नैसर्गिक आपत्तींचा फटका बसून त्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. 

सन २०१९ मध्ये आलेल्या महापुरात सांगली शहराची बाजारपेठ पाण्याखाली होती. गेल्या वर्षी मार्च पासूनच कोरोनाचे लॉकडाऊन सुरू होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पुन्हा सुमारे तीन ते चार महिने बाजारपेठ बंद होण्याची वेळ आली. यंदा मार्चपासून बाजारपेठेत कोरोनाच्या तडाख्यात सापडली. आधी निर्बंध आणि त्यानंतर लॉकडाऊन यामुळे बाजारपेठ ठप्प आहे. गेल्या दोन वर्षातील सर्व प्रमुख सण आणि लग्नसराईच्या हंगामात बाजारपेठ बंद ठेवण्याची वेळ आल्यामुळे व्यापाऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. त्याबरोबरच व्यापाऱ्यांचे स्वतःचे कुटुंब, कर्मचारी, त्यांचे कुटुंब हे सर्व आर्थिक अडचणीत सापडले असल्याने त्यांची उपासमार होऊ लागली आहे. 

कर्जाचे हप्ते शिवाय शासनाचे कर हेही त्यांना भरावे लागत आहे. यातही त्यांना शासनाकडून कोणतीही सूट मिळाली नाही. एकीकडे महापुर, सलग दोन वर्ष कोरोनाच्या आपत्तीचा तडाखा यात हजारो व्यापारी आर्थिकदृष्ट्या खचले आहेत. सांगलीतील व्यापाऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता त्यांना आता या परिस्थितीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत व्यापार सुरू करण्याची मुभा देण्यात यावी अशी विनंती आहे त्याचबरोबर शासनाकडून त्यांना आर्थिक सहकार्य तसेच कर माफी देण्याबाबतही गांभीर्याने विचार करावा व तसे जिल्हाधिकारीसो यांना सूचना द्याव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

यावेळी नगरसेवक विनायक सिंहासने, नगरसेविका सविताताई मदने, अतूल शहा व्यापारी महासंघ अध्यक्ष, अरुण दांडेकर किराणा माल महासंघ अध्यक्ष, चेतन दडगे - उपाध्यक्ष सांगली मिरज कुपवाड डेअरी असोसिएशन, प्रसाद गवळी- डेअरी असोसिएशन सदस्य, सुभाष रामनिवास सारडा- सेक्रेटरी कापड व्यापारी असोसिएशन, राजेंद्र पवार- व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष, अमर दीडवळ अध्यक्ष कुपवाड व्यापारी संघटना, गणपती साळुंखे उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments