Daily Mahasatta

Daily Mahasatta

संभाव्य पूरस्थितीसाठी सज्ज राहावे : जिल्हाधिकारी डॉ. चौधरी

सांगली, ता. २८, (प्रतिनिधी.) : हवामान विभागाने 98 ते 103 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे संभाव्य पूरपरिस्थिती उद्भविल्यास जिल्ह्यात पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधित विभागातील यंत्रणांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करावेत. तसेच आवश्यक साधनसामग्री सज्ज ठेवावी, असे , निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता मिलींद नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार तसेच प्रांताधिकारी, तहसिलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोना परिस्थितीत सर्व प्रशासन अहोरात्र काम करीत आहे. कोरोना परिस्थितीबरोबरच संभाव्य पूर परिस्थितीही हाताळणे ही अत्यंत महत्वाचे काम आहे. त्यासाठी कोणीही गाफील न राहता सतर्क राहून कामकाज करावे. तालुकास्तरावरील आपत्ती निवारण आराखडे सज्ज ठेवण्यात यावेत. जिल्हा प्रशासनामार्फत पुरविण्यात आलेले साहित्य यांचीही तज्ज्ञांकडून तपासणी करावी. आवश्यकता भासल्यास त्याची तातडीने दुरूस्तीही करून घ्यावी. जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या 104 पूरबाधित गावातील पूर आराखडे यांचे अवलोकन करून यामध्ये त्रुटी असल्यास त्या दुरूस्तीबाबतची कार्यवाही करावी. आपत्ती बाबतच्या रंगीत तालमी तातडीने घेण्यात याव्यात. बाधीत क्षेत्रात बोट चालविणाऱ्या व्यक्तींना अद्ययावत प्रशिक्षण देण्यात यावे. संबंधित विभागाचे नियंत्रण कक्ष 24 x 7 सुरू राहण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात. तसेच जिल्ह्यातील सर्व पाणी साठवण तलाव याची तपासणी करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Post a Comment

0 Comments