Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळा तालुक्याला वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा

शिराळा ( विनायक गायकवाड)

शिराळा तालुक्याला तोक्ते वादळाचा मोठा फटका बसला असून शेतकरी अक्षरशः उघड्यावर येण्याची वेळ येऊन ठेपली आहे. गेल्या आठवड्यात सलग पाच दिवस अवकाळी पाऊस आणि त्यापाठोपाठ अरबी समुद्रातील तोक्ते वादळ यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे.

शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून तालुक्यात सोसाट्याचा वादळी वारा आणि त्याचबरोबर मुसळधार पावसाने हजेरी लावून शेतकऱ्याचे कंबरडे मोडून काढले आहे. सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील वैरणी पाण्यात भिजून गेल्या आहेत. शेतातील शेड वरील पत्रे उडून गेल्याने जनावरांचे हाल झाले आहेत.

मोठ्या वाऱ्यामुळे अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे, कौले उडून गेल्याने संसार उघड्यावर आले आहेत. गटारी, नाले, ओघळ तुंबल्याने काही ठिकाणी पाणी घरात घुसले आहे. विद्युत डांब व झाडे उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. अद्यापही तो सुरळीत झाला नसल्याने शिराळा शहरासह अनेक गावांमध्ये पिण्याचा पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकरी व कामगार वर्ग हवालदिल झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे लॉक डाऊन मुळे हाल सुरू असतानाच सलग चार दिवस पडणाऱ्या पावसामुळे आणि वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामन्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. शेतात पाणी साचल्याने भाजीपाला शेतामध्ये पाण्यात कुजून चालला आहे. वांगी, टोमॅटो, कोथिंबीर, दोडका, कारली यांना जोराचा फटाका बसला आहे.

Post a Comment

0 Comments