Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळा नगरपंचायतीची सभा वादळी, भाजप नगरसेवकांचे गंभीर आरोप

शिराळा (विनायक गायकवाड) : शिराळा नगरपंचायत सर्वसाधारण मासिक सभा आरोप प्रत्यारोपाने वादळी ठरली. मुख्याधिकारी व प्रशासन सत्ताधाऱ्यांची कामे करतात. विकासकामे करताना आम्हाला विचारात घेत नाहीत असा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला.

खासदार आणि आमदार यांनी मंजूर केलेल्या निधीमध्ये नगरपंचायत मधील सत्ताधाऱ्यांकडून कडून दुटप्पी भूमिका घेतली जात आहे. विकासकामांबाबत सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना धारेवर धरले.
येथील व्यापारी असोसिएशन हॉल मध्ये नगरपंचायतीची सर्वसाधारण मासिक सभा झाली. नगराध्यक्षा सौ. सुनिता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, मुख्याधिकारी योगेश पाटील, विरोधी पक्ष नेते अभिजितसिंह नाईक प्रमुख उपस्थित होते.

विषय पत्रिकेवरील विषय वाचनास सुरवात होताच विकासकामे ठरवाबाबत भाजपच्या विरोधी नगरसेवकांनी आमदारांनी दिलेला निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे का वर्ग केला आहे अशी विचारणा केली. त्याचबरोबर खासदारांनी दिलेला निधी नगरपंचायत स्वतः खर्च करू शकते मग आमदारांनी दिलेला निधी का करू शकत नाही या मुद्यांवर मागील ठराव सभेत मांडत चांगलेच रान तापवले. मात्र सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ९ विरूद्ध ७ अशा मतांनी आमदारांनी दिलेला निधी सार्वजनिक बांधकाम विभागच खर्च करेल असा ठराव जिंकला. मात्र याबाबत आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे विरोधी नगरसेवकांनी सांगितले.

नगरपंचायत कडे असलेल्या २ जुन्या घंटा गाडीचा टाकाऊ पासून टिकाऊ या योजनेअंतर्गत (3R) तत्वांचा वापर करत मुख्याधिकारी यांच्या संकल्पनेतून एका गाडीचे शववाहिकेत रुपांतर तर एका गाडीचे रूपांतर औषध फवारणी गाडीमध्ये करून त्या नजीकच्या काही दिवसांत सेवेत दाखल होतील. शहराला नगरविकास विभागाचे वतीने आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडून ५ कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. तसेच खासदार धैर्यशील माने यांच्या कडून २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या दोघांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. सदरची मंजूर विकासकामे लवकरच सुरू होतील असे नगराध्यक्षा सौ. निकम यांनी सभागृहात सांगितले.

भाजपच्या विरोधी गटाचे नगरसेवक अभिजीत नाईक, उत्तम डांगे, केदार नलवडे यांनी मुख्याधिकारी व प्रशासन फक्त सत्ताधाऱ्यांची कामे करतात. सत्ताधाऱ्यांना सोबत घेऊन त्यांची मनमानी सुरू आहे. आमची कामे करत नाहीत त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात असा आरोप करत सभागृह दणाणून सोडले. विकासकामे करत असताना आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांनी सांगितले. शहरात विकासकामे व्हावीत म्हणून आम्ही भांडत आहे. मात्र ती होत असताना चुकीच्या पद्धतीने होऊ नयेत असे आमचे मत असल्याचे नगरसेविका सौ. नेहा सूर्यवंशी, सौ. सीमा कदम सौ. राजश्री यादव म्हणाल्या. तसेच प्रभाग क्र. १५ मधील देखभाल दुरुस्ती व स्वच्छता कामे होत नाहीत म्हणुन नगराध्यक्षा यांच्याकडे विचारणा केली. त्यावर नगराध्यक्षा यांनी येणाऱ्या ८ दिवसात तेथील कामे पूर्ण करू असे आश्वासन दिले.

पाणी पुरवठा सभापती मोहन जीरंगे यांनी शहरातील यापूर्वी झालेली विकासकामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. एका वर्षात कामे खराब होऊन गेली असल्यामुळे संबंधित ठेकेदाराने ती दुरुस्त करून देण्याची मागणी केली. नगरसेविका सीमा कदम म्हणाल्या तळीचा कोपरा येथील तळी मूजवून पसरणारी रोगराई थांबवावी अशी मागणी केली. आक्रमक झालेल्या नगरसेवक केदार नलवडे व उत्तम डांगे यांना शांत करण्यासाठी नगरसेवक विश्वप्रताप सिंह नाईक यांनी पुढाकार घेतला.

यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. सुनंदा सोनटक्के, सौ. अर्चना शेटे, बांधकाम सभापती सौ. प्रतिभा पवार, नगरसेविका सौ. सुजाता इंगवले, सौ. आशाताई कांबळे, नगरसेवक संजय हिरवडेकर, वैभव गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक कविता गायकवाड, शरद पाटील, सुभाष इंगवले, प्रिती पाटील, काजोल शिंदे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments