Daily Mahasatta

Daily Mahasatta

मराठा आरक्षण प्रश्नी विजयसिंहराजे महाडिक यांच्या पाठीशी ठाम : विनायक गायकवाड

सांगली (प्रतिनिधी)
मराठा आरक्षण संदर्भात आपण इतर कोणाचेही नेतृत्व मान्य करणार नसून गेली ३५ वर्षे मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आयुष्य खर्ची घालणाऱ्या विजयसिंह राजे महाडिक यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करणार असल्याचे मत अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष विनायक गायकवाड यांनी व्यक्त केले.

मराठा आरक्षण संदर्भात बोलताना विनायक गायकवाड म्हणाले, आरक्षणाचा मुद्दा आला की पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्री प्रमाणे अनेक जण समाजाचे बेगडी प्रेम घेऊन सामोरे येतात. अनेकजण स्वतः ला मराठा समाजाचे कैवारी समजतात. मात्र स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नंतर मराठ्यांचे खरे कैवारी हे विजयसिंह राजे महाडिक हेच आहेत.
अखिल भारतीय मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड (सा. सं.), शंभूराजे युवा क्रांती, जिजाऊ ब्रिगेड, मराठा आरक्षण संघर्ष व समन्वय समिती यांची महाराष्ट्रातील सर्व ताकत ही एकट्या विजयसिंह राजे महाडिक यांची आहे.

माझा मराठा आरक्षणसाठी महाराष्ट्र दौरा ३ वेळा पूर्ण झाला आहे. विजयसिंह राजे महाडिक यांनी मराठा समाजासाठी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. आरक्षणाच्या बाबतीत आजवर अनेकांनी आपली राजकीय व सामाजिक पोळी भाजून घेतली आहे. कोणी महामंडळ, कोणी आमदारकी तर कोणी खासदारकी मिळवली आहे. मात्र मराठा समाजासाठी निस्वार्थ झटणाऱ्या विजयसिंह महाडिक यांना आत्तापर्यंत उपेक्षा सहन करावी लागली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात त्यांनी संघटन उभे केले आहे. मराठा जोडा आणि मराठा वाढवा हे काम त्यांनी केले आहे.

मराठा आरक्षणसाठी आंदोलने, रास्तारोको, उपोषणे, परिषदा घेऊन सरकारचे लक्ष वेधले आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पासून विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत सगळ्यांना मराठा आरक्षण संदर्भात जाणीव करून दिली आहे. मराठा आरक्षण किती गरजेचे आहे हे वेळोवेळी पटवून दिले आहे. यापुढे मराठा समाजाला चांगली दिशा मिळावी म्हणून महाराष्ट्रातील मराठा समाजाची सगळी ताकत अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या माध्यमातून विजयसिंह राजे महाडिक यांच्या पाठीशी उभी करणार आहे. त्यासाठी आपण कोणतेही कष्ट सोसायला तयार आहे असेही विनायक गायकवाड शेवटी म्हणाले.

Post a Comment

0 Comments