Daily Mahasatta

Daily Mahasatta

डाॅक्टरांवर ॲट्रासिटीचा गुन्हा; विट्यात होणार मोठं आंदोलन

विटा (प्रतिनिधी) : इस्लामपूरातील प्रकाश हाॅस्पीटल मधील डाॅक्टरांसह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा केवळ राजकीय द्वेषातून दाखल करण्यात आला असून याबाबत प्रशासनाने योग्य चौकशी करुन संबधित कोव्हीड योद्धावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आली. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहीते, माजी उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे, विनोद पाटील, विकास जाधव, महेश बाबर, अजय पाटील, विश्वास करुळकर यांच्या उपस्थितीत तहसीलदार ॠषिकेत शेळके आणि पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना निवेदन देण्यात आले.

याबाबत शंकर मोहीते म्हणाले, कोरोनाच्या भीषण संकटात डाॅक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय स्टाफ आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. इस्लामपूरातील प्रकाश हाॅस्पीटल मध्ये देखील हजारो रुग्णांवर यशस्वी वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. या हाॅस्पीटलचा लाभ केवळ इस्लामपूरच नव्हे तर पलूस, कडेगाव, खानापूर या भागातील रुग्णांना होत आहे. अशावेळी काही विघ्नसंतोषी लोकांनी राजकीय द्वेषातून स॔बधित प्रकाश हाॅस्पीटल मधील डाॅक्टरांसह अन्य पाचजणांविरोधात अॅट्रासिटीचा खोटा गुन्हा नोंदवला आहे. 

आम्ही यापूर्वी देखील अॅट्रासिटीचा गैरवापर करुन कसे गुन्हे दाखल होतात, हे प्रशासनाला वेळोवेळी दाखवून दिले आहे. आता तर देवदूत बनून लाखो लोकांचे जीव वाचवत असलेल्या डाॅक्टरांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. याबाबत आम्ही प्रशासनाचा देखील तीव्र शब्दात निषेध करत आहोत. प्रशासनाने याबाबत सखोल चौकशी करुन संबधित कोव्हीड योद्धा वरील गुन्हे मागे घ्यावे अन्यथा १ जुन पासुन आम्ही विटा शहरात तीव्र आंदोलन करणार आहोत, असा इशारा शंकर मोहीते, दहावीर शितोळे, विकास जाधव यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments