Daily Mahasatta

Daily Mahasatta

चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्वागत कमान जमीनदोस्त

शिराळा (विनायक गायकवाड) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्‍या चांदोली राष्ट्रीय उद्यानाची लाखो रुपये खर्च करून बांधलेली आकर्षक स्वागत कमान तोक्ते वादळी वाऱ्याच्या तडाख्याने जमीनदोस्त झाली आहे.

ऐतिहासिक प्रचीतगडाच्या पायथ्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरदऱ्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत शिराळा तालुक्यामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान येते. २०१८ साली जाधववाडी चेक पोस्ट जवळ जवळपास सहा सात लाख रुपये खर्च करून पर्यटकांच्या स्वागतासाठी आकर्षक स्वागत कमान उभी करण्यात आली होती. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या या स्वागत कमानीवर आणि आजूबाजूला चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळणारे प्राणी, पक्षी यांच्या देखील प्रतिकृती लावण्यात आल्या होत्या. 
शनिवारी दुपारपासूनच तालुक्यांमध्ये सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावून तोक्ते वादळाची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती. रविवारी आणि सोमवारी वादळी वाऱ्यासह पावसाने कहर केला. याचा फटका सोमवारी दुपारच्या सुमारास चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या जाधव वाडी चेक पोस्ट जवळ असणाऱ्या भव्य आणि आकर्षक असणाऱ्या स्वागत कमानीस बसला आहे. जोराच्या वार्‍यामुळे ही स्वागत कमान पूर्णपणे पडली असून आजूबजूला लावलेल्या प्राण्यांच्या प्रतिकृती देखील मोडल्या आहेत. यामुळे सुमारे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Post a Comment

0 Comments