Daily Mahasatta

Daily Mahasatta

मराठा आरक्षणाच्या अपयशाला मराठा आमदार, खासदारच जबाबदार : विजयसिंह महाडिक

शिराळा ( विनायक गायकवाड) : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही त्यांनी ते रद्द केले. याला सर्वस्वी जबाबदार मराठा आमदार, खासदार आणि राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय असल्याचे मत अखिल भारतीय मराठा सेवा संघ व मराठा आरक्षण समन्वय समितीचे संस्थापक विजयसिंह महाडिक यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले गेली ३५ वर्षापेक्षा अधिक काळ मराठा समाजाला आरक्षण व इतर सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून खर्ची घातला आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्व मुख्यमंत्री यांना वेळोवेळी बैठका घेऊन मराठा आरक्षण किती गरजेचे आहे ते पटवून दिले आहे. यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. त्या धर्तीवर न्यायमूर्ती गायकवाड समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने पडताळून घ्यायला पाहिजे होता. यावर शेवटच्या घटकापर्यंत अभ्यास करून मराठा आरक्षण देणे गरजेचे होते. मात्र राज्य सरकार केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांनी असे न करता मराठा समाजाला आरक्षण न देण्याचा निर्णय दुर्दैवी आहे.

यापूर्वी काही अपवाद वगळता मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून करण्यात आलेली आंदोलने ही शांततेच्या मार्गाने केली होती. आता मात्र यापुढील काळात मराठा समाजातील युवक शांततेच्या मार्गाने लढा देतील असे वाटत नाही. मराठा आरक्षण प्रकरण चिघळण्यापूर्वी आणि समाजाचा उद्रेक होण्यापूर्वी राज्य सरकारने याबाबत योग्य ती पावले उचलावीत. यापुढे मराठा आरक्षण लढा लढत असताना त्या लढ्याला हिंसक वळण लागल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल.

आजच्या मराठा समाजाची जी परिस्थिती आहे त्यास मराठा आमदार, मराठा खासदार, मराठा साखर सम्राट, मराठा शिक्षण सम्राट, मराठा नेते, मोठे उद्योजक, गर्भ श्रीमंत मंडळी जबाबदार आहेत. यांनी कधीही गांभीर्याने समाजातील मागास घटकांच्याकडे पाहिलेले नाही. यापुढे यासर्व मंडळीनी मागास व गरजू मराठा समाजाला मदत करण्याची भूमिका ठेवावी. जसे पाणी आडवा पाणी जिरवा हे सूत्र अवलंबले तसेच मराठा नेते आडवा आणि त्यांची जिरवा ही भूमिका घेणे गरजेचे आहे. मराठा आरक्षण याकडे दुर्लक्ष केल्यास राज्य सरकार बरोबरच आमदार, खासदार, मराठा नेतेमंडळी, मराठा उद्योजक व गर्भ श्रीमंत मराठा यांना हातात दांडकी घेऊन वठणीवर आणावे लागले असेही श्री. महाडिक शेवटी म्हणाले.

Post a Comment

0 Comments