Daily Mahasatta

Daily Mahasatta

मराठा आरक्षण रद्द झाल्याने इस्लामपूरात तीव्र पडसाद

इस्लामपूर (सूर्यकांत शिंदे) : मराठा आरक्षण रद्द झाल्याचे पडसाद इस्लामपूर शहरात उमटले. शहरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढे मुंडण करुन केंद्र सरकार, राज्य सरकार आणि न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा घोषणाबाजी करत निषेध केला. केंद्र सरकार, राज्य सरकार बाजू मांडण्यात अपयशी ठरले असल्याच्या भावना मराठा क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

बेकारीने पिचलेल्या मराठा समाजाला आरक्षणाबद्दल न्यायालयाकडून सकारात्मक निर्णयाची आशा होती. ती धुळीस मिळाली असल्याची भावना तरुणांकडून व्यक्त होत आहे. सरकारने मांडलेल्या मुद्द्यांवर सुप्रिम कोर्टाने निर्णय दिला आहे , याचा फेरविचार व्हावा असेही मत व्यक्त केले. मराठा समाजाला वाऱ्यावर सोडले तर स्वस्थ बसणार नाही. राज्यातील कार्यकारिणीची बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ. इथून पुढची लढाई यापेक्षा ताकदीने लढणार असल्याची घोषणा केली.

यावेळी समन्वयक उमेश कुरळपकर, दिग्विजय पाटील, विजय महाडिक, सागर जाधव, सचिन पवार, अभिजीत शिंदे, विजय लाड , रामभाऊ कचरे,अमोल पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
-------------------------------,
निकाल अत्यंत दुर्दैवी...
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा समाजाला न्यायालयाच्या या निर्णयाने मोठा धक्का बसलेला आहे. या निकालाचा अनेक पिढ्यांवर परिणाम होणार आहे. कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल फेटाळणे दुर्दैवी आहे. मराठा आरक्षण देण्यासारखी स्थिती राज्यात नाही हे कोर्टाचे म्हणणे चुकीचे व निषेधार्थ आहे. आम्ही पुन्हा लढा उभा करु व आरक्षण मिळवू. सगळ्याच मराठा नेत्यांचा व राजकीय पक्षांचा मराठा क्रांती मोर्चा वाळवा तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो. 

Post a Comment

0 Comments