Daily Mahasatta

Daily Mahasatta

वैद्यकीय अधिक्षकांच्या कामाची चौकशी करा : जिल्हाधिकारी

शिराळा (विनायक गायकवाड) : येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. जे. के. मोमीन व ग्रामीण रुग्णालय कोकरूडच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. सलमा इनामदार यांच्या कामाची चौकशी करून त्वरित अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांना दिला आहे. तसेच कोरोना कालावधीत कामामध्ये हालगर्जीपणा केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला.

येथील तहसिल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सद्यस्थितील कोरोना कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, प्रांताधिकारी ओमकार देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, तहसिलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, मुख्याधिकारी योगेश पाटील यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांना सर्व औषधे उपलब्ध असताना बाहेरून औषधे आणण्यासाठी चिट्ठी देणे याबाबत डॉ. मोमीन यांच्याविरुद्ध तक्रारी आल्या आहेत. त्याचबरोबर कोकरूड ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. इनामदार यांच्याबाबत कोरोनाची पाहिली लाट संपल्यावर अडीच महिन्यात कोणत्याही आजाराचा एकही रुग्ण न तपासणे आदी तक्रारी आल्या आहेत. असे सांगत ही गंभीर बाब आहे त्यामुळे त्यांच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्याबाबत नियोजन करण्यात यावे. ज्या गावांमध्ये कोविड रुग्णांची संख्या जास्त आहे त्या गावांमध्ये संस्थात्मक अलगीकरणावर भर देण्यात यावा. संबधित गावातील ग्राम दक्षता समित्यांनी सक्षमपणे काम करुन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

याचबरोबर जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन कॉन्संट्रेटर बँक हा उपक्रम राबविण्यात येत असून या ऑक्सिजन कॉन्संट्रेटर बँकचा प्रभावी वापर शिराळा तालुक्यात करण्यात यावा. आरोग्य यंत्रणा व महसुल यंत्रणेने बेड मॉनिटरिंग सिस्टीम अपडेट ठेवावी. हायरिस्क रुग्णांबाबत बेडसाठी रुग्णांची हेळासांड होऊ नये यासाठी बेडची माहिती हॉस्पिटलच्याबाहेर दर्शनी भागात लावण्यात आलेली आहे ती अपडेट ठेवण्यात यावी असे सांगितले.

यावेळी सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय पाटील , पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार , सहाय्यक गटविकास अधिकारी अरविंद माने, डॉ अनिरुद्ध काकडे , डॉ मनोज महिंद आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments